रेमडेसिविरची जादू, उजेडात आली २४१ रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:50+5:302021-04-21T04:10:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सात हजारच बेड उपलब्ध असल्याचे समजून शासकीय ...

The magic of Remedesivir, 241 hospitals came to light | रेमडेसिविरची जादू, उजेडात आली २४१ रुग्णालये

रेमडेसिविरची जादू, उजेडात आली २४१ रुग्णालये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सात हजारच बेड उपलब्ध असल्याचे समजून शासकीय पातळीवरून नियोजन केले जात होते. परंतु, रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे पुरवठ्यासाठी रुग्णालयांना लेटरहेडवरील पत्र बंधनकारक केल्याने तब्बल २४१ रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात १२,२९६ बेड असल्याचेही यामुळे उघड झाले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध नाही, ऑक्सिजन मिळत नाही अशी स्थिती आहे. बेडचे व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र, त्यामध्ये सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली नाही, हे देखील उघड झाले आहे. कारण कोविड रुग्णांवर उपचार करणारी पण सरकारी पोर्टलवर कोणतीही नोंद नसलेली तब्बल २४१ हाॅस्पिटल केवळ रेमडेसिवीर इंजेक्शनच्या आदेशामुळे उजेडात आली आहेत. शासनाने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे हाॅस्पिटलच्या लेटरहेडवर अधिकृतरीत्या नोंद केल्याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार नाही असे आदेश काढले आहेत. त्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल ५४० खासगी हाॅस्पिटलने शासनाच्या कोविड पोर्टलवर नोंद करून कोविड रुग्णांवर उपचार करत असल्याचे मान्य केले. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या आदेशाने एक प्रकारे जादूच केली असून, बेड्सची संख्या देखील ७ हजारांवरून थेट १२ हजार २९६ वर जाऊन पोहोचली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि आता दुसऱ्या लाटेत देखील रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन बेड्सचा प्रचंड तुटवडा अशी परिस्थिती होती. सध्या देखील रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स बेड्स उपलब्ध होत नसल्याची आहेत. शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्या तुलनेत सरकारी यंत्रणेकडून बेड्सची संख्या वाढली नाही. परंतु बेड्स उपलब्ध होत नाही यापेक्षा सध्या रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहे, पण ऑक्सिजन मिळत नाही याबाबत अधिक तक्रारी आहेत. परंतु शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मेडिकल अथवा वितरकांकडे उपलब्ध होणारे रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा पूर्णपणे बंद करून खाजगी अथवा सरकारी हाॅस्पिटलने जिल्हाधिकारी यांच्याकडे हाॅस्पिटलच्या लेटर हेडवर अधिकृत नोंद केल्याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार नाहीत असे आदेश काढले. पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी या आदेशात बदल करून ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील, त्यासाठी आपल्या हाॅस्पिटलमध्ये किती ऑक्सिजन बेड्स व आयसीयू बेड्स कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत आणि सध्या किती रुग्ण उपचार घेतात यांची माहिती देण्यास सांगितली. यामुळेच पुणे शहर आणि जिल्ह्यात पंधरा दिवसांत कोविड रुग्णांवर उपचार करणा-या हाॅस्पिटलची संख्या २९९ वरून थेट ५४० झाली.

--------

शहर आणि जिल्ह्यातील खासगी कोविड हाॅस्पिटल आणि बेड्सची संख्या

पंधरा दिवसांपूर्वीची नोंदणी आजची नोंदणी

रुग्णालये- 299 540

ऑक्सिजन व

आयसीयू बेड्स 7000 12296

--------------

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ऑर्डरमुळे वाढली हाॅस्पिटल, बेड्सची संख्या

जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिविर इंजेक्शन हवे असल्यास संबंधित हाॅस्पिटलने अधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करत असल्याचे संबंधित यंत्रणेचे पत्र आणि ऑक्सिजन व आयसीयू बेड्सची संख्या सरकारी कोविड पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक केले. यामुळे पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत खाजगी कोविड हाॅस्पिटलची संख्या २९९ वरून ५४० वर तर बेड्सची संख्या ७ हजारावरून थेट १२२९६ वर जाऊन पोहचली. यामध्ये दररोज वाढ होत आहे.

-विजयसिंग देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

Web Title: The magic of Remedesivir, 241 hospitals came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.