संजीवन सोहळ्यानिमित्त आज माऊली समाधीची महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:02+5:302020-12-11T04:30:02+5:30
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शुक्रवारी (दि.११ ) सुरुवात होईल. मध्यरात्री ...
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शुक्रवारी (दि.११ ) सुरुवात होईल. मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा होणार आहे. या पूजेसाठी प्रमुख अतिथींसह पन्नास जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला ८ डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडुरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह एकादशीच्या दिवशी आळंदीत दाखल होणार आहेत.
दरम्यान, वारीतील कार्तिकी एकादशीला (दि.११) दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंतची असलेली नगरप्रदक्षिणा होणार नाही. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नगरप्रदक्षिणाऐवजी माऊलींची पालखी देऊळवाड्यातच प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. तर, द्वादशीला (दि.१२) दुपारी चार ते सात यावेळेत होणार माऊलींचा रथोत्सव कार्यक्रम आहे. मात्र यंदा हा रथ हाताने ओढण्यास बंदी घालण्यात आली असून स्वयंचलित वाहनात प्रतीकात्मक स्वरूपात रथोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे.
------
तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मध्यरात्री माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक होणार आहे.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)