महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:57 AM2017-07-30T03:57:15+5:302017-07-30T03:57:26+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये उपनगरांमधील अधिक महाविद्यालयांचा समावेश असल्याचे दिसते. पसंतीक्रमात २ ते १० मध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न घेता पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाºया या प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत अकरावीची सुमारे ९१ हजार प्रवेश क्षमता असून त्यासाठी सुमारे ७८ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदाही रिक्त जागांचा आकडा मोठा असेल. पहिल्या दोन फेºयांमध्ये हे चित्र ठळकपणे दिसून आले आहे.
पहिल्या फेरीत १४ हजार ६७२, तर दुसºया फेरीत १० हजार ५३१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे घेतलेले प्रवेश रद्दही केले आहेत. या दोन फेºयांअखेर सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत प्रवेश घेतला आहे. तर, कोट्यातील प्रवेशासह हा आकडा सुमारे ४७ हजार एवढा आहे. तिसºया फेरीसाठी १४ हजार ३९२ विद्यार्थ्यांची निवड झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेश घेणारे विद्यार्थी पहिल्या दोन्ही फेºयांप्रमाणे कमी असतील. त्यामुळे या फेरीअखेरीस ५५ ते ६० टक्केच प्रवेश होतील, अशी शक्यता आहे. समितीने या वर्षीपासून पसंतीक्रमांक २ ते १० नुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे अनेक विद्यार्थी निवड होऊनही प्रवेश घेण्याचे टाळत आहेत. चांगले महाविद्यालय मिळेल, या आशेने ते पुढील फेरीत सहभागी होत आहेत. परिणामी, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.
अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप ५० टक्केही
प्रवेश झालेले नाहीत. विद्यार्थ्यांकडून प्रामुख्याने शहराच्या मध्य भागातील महाविद्यालयांना पसंती मिळत आहे. त्यामुळे उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची टक्केवारी कमी दिसत आहे.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची एकूण ६४० प्रवेश क्षमता आहे. पहिल्या दोन फेºयांपर्यंत इनहाऊस कोट्यासह २८० प्रवेश झाले आहेत. मागील वर्षीपर्यंत दोन फेºयांमध्ये किमान ४०० प्रवेश होत होते. उपनगरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. पुढील फेरीत प्रवेश होतील, असे समितीकडून सांगितले जात आहे.
- संजय सोमवंशी, प्राचार्य
गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय