महाबळेश्वरला घोडेस्वारी नको रे बाबा! विष्ठेमुळे पसरतेय रोगराई
By श्रीकिशन काळे | Published: January 5, 2024 06:04 PM2024-01-05T18:04:59+5:302024-01-05T18:05:18+5:30
घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतामध्ये मिसळून मग नागरिकांच्या पोटात जात आहे, असे संशोधनातून समोर
पुणे : महाबळेश्वरमध्ये घोड्यांच्या विष्ठेमुळे रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. ही विष्ठा वेण्णा तलावाच्या पाण्यात मिसळत असून, त्यामुळे नागरिक आणि पर्यटक यांना अनेक आजार होत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस देखील आढळून आला आहे. या मुलांचे लसीकरण झाल्यानंतरही त्यांच्यात हा व्हायरस असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोड्यांना इतरत्र हलवणे किंवा त्यांची विष्ठा एकत्र करणे आवश्यक आहे. घोड्यांच्या मागे विष्ठा पडण्यासाठी बॅग लावली तर जमिनीवर ते पडणार नाही, असे उपायही यावर सुचविण्यात आले आहेत.
‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या वतीने महाबळेश्वर येथे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. याची माहिती गोखले इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रा. प्रीती मस्तकार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रा. गुरूदास नूलकर, निखिल अटक आदी उपस्थित होते. ‘सीएसडी’ या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेतला होता. तीन वर्ष या प्रकल्पावर काम झाले. त्या प्रकल्पामध्ये महाबळेश्वरची निवड केली होती. संस्थेच्या प्रा. डॉ. मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी त्यावर काम केले. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना देखील विविध आजारांचा त्रास होत आहे. यावर संशोधन केल्यानंतर समजले की, घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतामध्ये मिसळत आहे. त्यातून मग नागरिकांच्या पोटात जात आहे. परिणामी त्यांना विविध आजार होत आहेत.
दरम्यान, ‘गोखले इन्स्टिट्यूट’ने महाबळेश्वरसंदर्भातील अभ्यासाची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना दिली आहे. त्यावर ते कार्यवाही करू असे म्हणाले आहेत.
कसा झाला अभ्यास ?
महाबळेश्वरला वेण्णा तलावातून पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे तिथल्या पाण्याचा नमुना घेतला होता. तसेच इतर जलशुध्दीकरण केंद्र, घरातून, भुजलातून नमुने घेण्यात आली. त्यामध्ये प्रदूषण आढळून आले. मग प्रदूषणाचा उगम शोधला आणि मग घोड्यांची विष्ठा पाण्यात जात असल्याचे समोर आले.
कोणते आजार होतात ?
घोड्यांची विष्ठा तलावामध्ये जात असल्याने नागरिकांना अतिसार, श्वसनाचा संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग, टायफॉइड आदी आजार होत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये लसीकरणानंतरही रोटा व्हायरस दिसून आला. जो घोड्यांच्या विष्ठेमुळे होतो. गेल्या काही वर्षांमध्ये श्वसनाचे आजार, रोटा व्हायरस, पोटविकाराचे आजार वाढल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
तलाव प्रदूषित
वेण्णा तलावाशेजारीच घोड्यांची सफर होते. महाबळेश्वरमध्ये १७० घोडे आहेत. त्यांची विष्ठा जमिनीवर पडते. त्यामुळे घोडे चालताना ही विष्ठा उडते आणि ती श्वसनाद्वारे मानवी शरीरात जाते. हीच विष्ठा पावसाळ्यात पाण्यासोबत तलावामध्ये जाते आणि अनेक पाण्याच्या पाइपमध्येही जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे, असे डॉ. मस्तकार यांनी सांगितले.
काय करता येईल ?
- तलावापासून घोड्यांना दूर इतरत्र ठेवणे
- मोकळ्या जागेवर एकत्र ठेवून तिथे घोडेस्वारी करणे
- व्यापाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे
- घोड्यांची विष्ठा एकत्र करून त्यापासून बायोगॅस होऊ शकेल
- घोड्यांच्या मागे विष्ठेसाठी बॅग लावणे