पती-पत्नीतील वाद सोडवत पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वर सहलीचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 12:28 PM2024-04-07T12:28:31+5:302024-04-07T12:29:16+5:30
पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देत त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले
नितीश गोवंडे
पुणे : ‘ती’ उच्चशिक्षित असल्याने चांगल्या नोकरीला, त्यामुळे तिला पगारही गलेलठ्ठ. आई-वडिलांच्या इच्छेनुसार सहाच महिन्यांपूर्वी तिने अरेंज मॅरेज केले. आनंदाने नव्या आयुष्याला सुरूवात केली. मात्र, जोडीदाराने मध्येच आडकाठी घालत तू तुझ्या आई-वडिलांना एकही रुपया द्यायचा नाही म्हणत मारहाण अन् शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही दिवस तिने हा त्रास सहनही केला. पण, त्रास वाढू लागल्याने ती थेट सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी देखील कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तिच्या आई-वडिलांची भूमिका निभवत तिच्या संसाराचा गाडा पुन्हा आनंदी करून दिला.
मयूर आणि संजना (नाव बदललेली आहेत) असे या नवदाम्पत्याची नावे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या दोघांचे लग्न झाले. संजना उच्चशिक्षित असून, ती नामांकित कंपनीत नोकरीला आहे. दरमहा ७० हजार पगार आहे. पण, संजना लग्नाच्या आधीपासूनच आई-वडिलांवर असलेला कर्जाचा ताण हलका करण्यासाठी त्यांना दरमहा काही पैसे देत आहे. तिचे लग्नाचे वय झाल्याने वडिलांनीच तिला लग्न करण्याबाबत सुचवलं. तिनेही वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी (मयूर) लग्न केले. मयूर औंध भागातील एका रुग्णालयात नोकरीला. त्याला पगार कमी, तरीही तिने आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न केले. लग्नानंतर दोघे आनंदाने राहू लागले.
दरम्यान, मयूरने पत्नी संजनाचे बँक खाते व ऑनलाइन व्यवहार तपासले. यात पत्नी तिच्या आई -वडिलांना दरमहा २० हजार रुपये देत असल्याचे दिसले. त्यामुळे तो चिडला. त्याने आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. याच कारणावरून मयूरने पत्नीला मारहाण व शिवीगाळदेखील केली. सासू-सासऱ्यांपर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी दोघांनाही समजावून सांगून पुन्हा वाद न करण्यास सांगितले. काही दिवस वाद मिटला. मात्र, पुन्हा मयूरने पैशांवरून आणि तू सतत भाऊ व आई-वडिलांना फोनवर काय बोलते ते मला सर्व सांगायचे. तू त्यांना पैसे द्यायचे नाहीत, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. दररोजचा वाद विकोपाला जाऊ लागला. या त्रासाला कंटाळून शेवटी संजनाने थेट सिंहगड रोड पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार व उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या मुलीचे आई-वडिल होत तिची पूर्ण कहाणी ऐकली. तिला धीर देत मयूरला सायंकाळी पोलिस चौकीत बोलवून घेतले. विजय कुंभार यांनी स्वत: चौकीत जात या दोघांना समोरासमोर बसवले आणि त्यांना विचारपूस केली. दोघांचे ऐकल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. मयूरला पोलिसांनी मार्गदर्शन आणि चुकत असलेल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्याला या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याने माफी मागितली अन् पुन्हा असं करणार नाही, याची हमीही दिली. योगायोग मयूरचा वाढदिवसदेखील त्याच दिवशी (४ एप्रिल) होता. हे वरिष्ठ निरीक्षक कुंभार यांना कळताच त्यांनी पोलिस चौकीतच केक कापून त्याचा वाढदिवस सर्वांसोबत साजरा केला.
एकमेकांना केक भरवत वादाचा शेवट केला गोड..
संजनाने मयूरचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने त्याला गिफ्ट घेतले होते. परंतु, त्यांच्यात वाद झाल्याने ती आई-वडिलांकडे गेली होती. ते एकमेकांशी बोलतही नव्हते. त्यात ऐन वाढदिवसाच्या दिवशी पतीला पोलिस ठाणे बघावे लागले. संजनाने आज मयूरचा वाढदिवस आहे, असे सांगितल्यानंतर तत्काळ वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी केक मागवला. दोघांमधील वाद मिटवून त्यांना वाढदिवसाचा केक कापायला लावला. एकमेकांना केक भरवून त्यांच्या वादाचा शेवट गोड केला.
नवीन संसार असल्याने वाद होत असतात; पण यातून मारहाण करणे चुकीचे आहे. दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देत त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले आहे. आता दोघांमध्ये कोणताही वाद नाही. पत्नीला मारहाण केल्यास पतीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोघांनाही एकमेकांच्या आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचा अधिकार नाही. - विजय कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड पोलिस ठाणे
महाबळेश्वर सहलीचे पॅकेज..
पती-पत्नीच्या वादाच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येतात. सुरुवातीला दोघांचेही समुपदेशन केले जाते. तरीही काही चुकीचे घडले तर कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात दोघेही उच्चशिक्षित असून, त्यांचे आई-वडीलदेखील सुशिक्षित आहेत. त्यांची समजूत घातली असून, एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी आमच्याकडून त्यांना महाबळेश्वर सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे. - सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक, सिंहगड पोलिस ठाणे