कचरा पेटल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या
By admin | Published: May 11, 2017 05:00 AM2017-05-11T05:00:48+5:302017-05-11T05:00:48+5:30
पेटलेल्या कचऱ्यामुळे वीजवाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव
पुणे : पेटलेल्या कचऱ्यामुळे वीजवाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव, धायरीगाव, नांदेडगाव आणि सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
नांदेड सिटीजवळील वडगाव पुलाजवळ असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ टाकण्यात आलेला कचरा सकाळी साडेअकराच्या सुमारास पेटला. तत्पूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे कर्मचारी वीजयंत्रणेची तपासणी करीत होते, त्या वेळी कचऱ्यामुळे वीजवाहिन्या जळत असल्याचे निदर्शनास आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या आगीत उच्च दाबाच्या ५ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे खडकवासला उपकेंद्राच्या दोन इनकमिंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी, या उपकेंद्रातील तीन आऊटगोइंग वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे धायरीगाव, वडगाव, नांदेडगाव, सिंहगड रस्ता या परिसरातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांना फटका बसला. महावितरणकडून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.