महादेव जानकर बारामतीत तीन दिवसांपासून तळ ठोकून ; लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:16 PM2021-03-17T15:16:32+5:302021-03-17T15:18:19+5:30
माजी मंत्री जानकर हे गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरु
बारामती : बारामतीमधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला भरभरून मतदान केले. याची जाणीव मला आहे. त्यामुळे बारामतीकरांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
माजी मंत्री जानकर हे गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. यामध्ये जानकर हे जुन्या मित्रांच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यावेळी सायकलिंग करणे, पोहणे, शेतातील वस्तीवर मुक्कामी राहत ते सर्वसामान्यांमध्ये मिसळत आहेत. त्यातच त्यांनी बारामतीकरांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. येथे लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पुढील रणनिती ठरविण्यासाठी हे दौरे असल्याचे जानकर यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे जानकर यांनी पुन्हा बारामती लोकसभानिवडणूक लढविण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.
२०१४ मध्ये जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविली होती. यावेळी जानकर यांच्या बरोबर लढत देताना खासदार सुळे यांना केवळ ६७ हजार ७१९ मतांचे मताधिक्य मिळाले होते. ऐनवेळी बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवून देखील जानकर यांनी मिळविलेली मते त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा जानकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी राजकीय व्यूहरचना सुरू केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अधिवेशन संपेपर्यंत सरकारने वीज तोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र अधिवशेन संपताच वीज तोडणी सुरू केली, हे योग्य नाही. शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी. अन्यथा राष्ट्रीय समाजपक्ष मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा जानकर यांनी दिला.
—————————————