उजनी धरणातील दूषित पाण्याकडे सरकारने लक्ष द्यावे- महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:57 PM2022-10-14T12:57:26+5:302022-10-14T12:57:33+5:30
इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली...
इंदापूर : मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणाच्या रसायनयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी बुधवारी (१२) पत्रकारांशी बोलताना केली. इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले की, मी पाण्यात मध्यभागी गेलो. तेथील पाणी हातातदेखील घेऊ वाटले नाही. हे पाणी शेतीयोग्य नाही. त्यामुळे माणसाच्या जीविताला या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आपल्या माहितीप्रमाणे सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाने दिलेल्या पाणी अहवालात हे पाणी शेतीयोग्य तर नाहीच, शिवाय जनावरांसाठी पिण्यायोग्यही नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
जे पाणी शेती व जनावरांसाठी योग्य नाही ते लोक पित आहेत. चिलापीवगळता सर्व माशांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत. चिलापीचा अंतदेखील फारसा लांब राहिलेला नाही. पाणी ही काही कालावधीनंतर सडलेल्या अवस्थेत दिसेल, अशा शब्दात त्यांनी आपला खेद व्यक्त केला. राज्य सरकार, प्रदूषण महामंडळाने योग्य ती दखल घ्यावी. संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करावी. उजनीच्या पाण्याचे पूर्णतः शुध्दीकरण करण्यात यावे. पुणे, कुरकुंभ व रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जे प्रकल्प उजनी जलाशयात दूषित व रसायनयुक्त पाणी सोडतात, त्यांना त्या पाण्यावर प्रक्रिया करावयास सांगण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. कंपन्यांनी ती खबरदारी घेतल्यास पाणी दूषित होण्यापासून वाचेल. असंख्य लोक व जलचरांचे प्राण वाचतील, असे ते म्हणाले.
उजनीचे पाणी गटार झालयं....
यावेळी जानकर यांच्याशी संवाद साधताना मच्छिमार पांडुरंग पल्लारी म्हणाले की, उजनी पात्र गटार झाले आहे. चार दिवसांनी ऊन पडल्यावर हे पाणी हिरवे दिसेल. या पाण्याने शेती मारली, जुन्या जातीचे मासे मारले. मासेमारीचा व्यवसाय मारला. आता केवळ चिलापीच मोठ्या प्रमाणात मिळते आहे. आम्ही उजनीचे पाणी प्यायला वापरले तर मरुनच जाऊ, त्यामुळे विंधनविहिरीचे पाणी पितो आहोत.