महादेव जानकर म्हणतात, आलो महापालिका बघायला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:56 AM2018-03-04T03:56:42+5:302018-03-04T03:56:42+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करणे व अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी भाजपाच्या सभागृह नेत्यांच्या कार्यालयात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असतानाच अचानक पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी महापालिकेत हजेरी लावली.
पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करणे व अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी भाजपाच्या सभागृह नेत्यांच्या कार्यालयात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असतानाच अचानक पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री
महादेव जानकर यांनी महापालिकेत हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जानकर यांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराची चिठ्ठी घेऊन पाठविल्याची चर्चा वर्तुळात सुरू झाली. याबाबत मात्र जानकर यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश नाही, तर केवळ महापालिका पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्ट केले.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी महापालिकेमध्ये गर्दी केली होती. इच्छुक सदस्यांची सभागृह नेत्यांच्या कार्यालयात गर्दी झाली होती. याच वेळी महादेव जानकर या या वेळी जानकर महापालिकेत आले व थेट सभागृह नेत्यांच्या कार्यालयात गेले. आमदार जगदीश मुळीकदेखील त्यांच्यासोबत होते.
या बैठकीनंतर जानकर म्हणाले, ‘महापालिकेत निवडणुकीचा आपल्या भेटीचा कोणताही संबंध नसून, मी केवळ महापालिका पाहण्यासाठी आलो आहे. याचा कोणताही राजकीय संबंध लावू नये असे स्पष्ट केले’.
रासपाला हव्या १० जागा
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) भाजपा किमान १० जागा सोडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपा मोठा पक्ष असला तरी रासपच्या पाठिंब्यामुळे ताकद मिळाली आहे. यामुळे भाजपा आपल्या पक्षाला जागा सोडताना नक्की विचार करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.