महादेव तांबडे कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक
By admin | Published: January 5, 2017 01:12 AM2017-01-05T01:12:48+5:302017-01-05T01:12:48+5:30
प्रदीप देशपांडे पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त
कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून महादेव तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी असलेले प्रदीप देशपांडे यांची दक्षिण विभाग पुणे शहरच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीवर नियुक्ती झाली. गृह विभागाने बुधवारी हे आदेश जारी केले. देशपांडे यांना १४ महिन्यांसाठी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार मिळाला.
जिल्हा पोलिस अधीक्षक देशपांडे हे नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद येथे ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले असताना त्यांचा पदभार एम. बी. तांबडे यांच्याकडे सोपविला होता. यादरम्यान त्यांच्यासमोर नगरपालिका निवडणुकांचे आव्हान होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेतली. ते सध्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (सीआयडी) पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
देशपांडे यांनी १४ महिन्यांच्या कालावधीत सहकाऱ्यांना आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या तपासामध्ये काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरशी माझे भावनिक नाते आहे. माझे या ठिकाणी शिक्षण झाले. माझ्या कर्मभूमीचे ऋण फेडण्याची संधी मला यानिमित्ताने मिळाली. पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन घरे तसेच नवीन उपक्रम राबविण्यामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, त्याला यश मिळाले.
- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक