विमातळ होणार असेल, तर इच्छामरण द्या!;पारगावात महाग्रामसभा, राष्ट्रपतींकडे पाठविणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 06:26 PM2018-02-05T18:26:38+5:302018-02-05T18:28:17+5:30

पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे विमानतळाला जमिनी देण्यास पारगावसह ७ गावांतील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Mahagram Sabha in Pargaon, Junar, send the application to the President, oppose airport | विमातळ होणार असेल, तर इच्छामरण द्या!;पारगावात महाग्रामसभा, राष्ट्रपतींकडे पाठविणार अर्ज

विमातळ होणार असेल, तर इच्छामरण द्या!;पारगावात महाग्रामसभा, राष्ट्रपतींकडे पाठविणार अर्ज

Next
ठळक मुद्देग्रामसभेत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचे भरून घेतले अर्ज७ गावांच्या परिसरातील सुमारे ६ हजार एक्कर क्षेत्रावर उभारण्यात येणार विमानतळ

जेजुरी : पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे विमानतळाला जमिनी देण्यास पारगावसह ७ गावांतील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी पारगाव येथे महाग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचे अर्ज भरून घेतले आहेत. ते राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णयही या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वणपुरी, उदाचीवाडी या ७ गावांच्या परिसरातील सुमारे ६ हजार एक्कर क्षेत्रावर छ. संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळ उभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या यापूर्वीच सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. नुकतीच संरक्षण विभागाकडूनही विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर लोहगाव विमातळावरून खासगी मालकीची तसेच नागरी वाहतूक करणाºया व विमानांची उड्डाणे बंद करण्याच्या अटींवर हिरवा कंदील मिळाला आहे. 
विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आता मिळाल्या असल्याने जमीन अधिग्रहणाला सुरुवात होईल.  पुरंदर विमानतळाला संरक्षण खात्याचा हिरवा कंदील जरी मिळाला असला, तरी ही स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र लाल दिवाच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 
या पार्श्वभूमीवर येथील बाधित शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आज सकाळी १० वाजता पारगाव येथील पारेश्वर मंदिराच्या सभामंडपात या ७ गावांची महाग्रामसभा झाली. पुणे जिल्हा परिषदेचे स्थानिक सदस्य व विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला मनसेचे नेते बाबा जाधवराव, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जगताप, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी, देविदास कामथे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रकाश खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष हगवणे, पारगावचे सरपंच बापू मेमाणे, एखतपूर मंजवडीच्या सरपंच लक्ष्मी धिवार, खानवडीचे रमेश बोरावके, कुंभारवळणचे अमोल कामथे तसेच उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा झेंडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी, महिला उपस्थित होत्या. या वेळी विमानतळविरोधी घोषणा देऊन शासनाचा निषेधही करण्यात आला. 
या वेळी विमानतळ हा काही विकासाचा मुद्दा नाहीच. फक्त २ टक्के अतिश्रीमंतांसाठी ही सुविधा असून, ती ज्यांना हवी त्यांच्यासाठी त्यांच्याच भागात विमानतळ करावा, त्यांच्यासाठी २० हजार गोरगरीब शेतकऱ्यांचा बळी घेऊ नये, शेतकऱ्यांची इछा असेल तरच विमानतळाचा प्रकल्प राबवावा, अन्याय करण्याची भूमिका असेल तर आम्हाला शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरावे लागेल. यात बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण पुरंदर तालुक्यातील शेतकरी उभे राहतील, असे या वेळी बाबा जाधवराव यांनी म्हटले आहे.
ग्रामसभेत उपस्थित शेतकऱ्यांनी विमानतळाला एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय घेतला असून, शासनाकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे धर्मा पाटील या शेतकऱ्यासारखीच इथल्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. यासाठी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींनी आम्हाला इच्छामरणाची परवानगी देण्याचा ठरावही करण्यात आला आहे. तसे अर्ज सर्व बाधित शेतकऱ्यांनी अर्जही भरले आहेत. ती सर्व पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, विमानतळाविरोधात न्यायालयातही जाण्याचा निर्णय घेऊन तसे ठराव केले आहेत. लवकरच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा महामोर्चा काढण्यात येईल, असे जि. प. सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले. 
या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जगताप, गंगाराम जगदाळे आदींची भाषणे झाली. 
ग्रामसभेला सातही गावांतील शेतकरी उपस्थित होते. जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास होले यांनी आभार मानले.

Web Title: Mahagram Sabha in Pargaon, Junar, send the application to the President, oppose airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.