महाजनादेश यात्रा जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:13 PM2019-09-14T22:13:24+5:302019-09-14T22:18:28+5:30
राज्यभर भारतीय जनता पक्षाने काढलेली महाजनादेश यात्रा ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी काढली आहे आणि त्यासाठी मी पुण्यात आलो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले आहे.
पुणे : राज्यभर भारतीय जनता पक्षाने काढलेली महाजनादेश यात्रा ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी काढली आहे आणि त्यासाठी मी पुण्यात आलो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले आहे. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात हडपसर येथे ते बोलत होते.
शुक्रवार (दि. १३ सप्टेंबर)पासून महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्पाला सुरुवात झाली आहे. .तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांना भावनिक आवाहन केले.
ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाजानदेश यात्रा निघाली आहे. मागील पाच वर्षांत सरकारने केलेली कामे जनतेच्या दरबारी मांडून जनतेचा आशीर्वाद मिळवायचा आणि पुन्हा एकदा पाच वर्षांकरिता जनतेच्या सेवेत कार्यरत व्हायचं याकरिता ही यात्रा काढली आहे.मी केवळ तुमचा जनादेश घ्यायला आहे. तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून आम्ही मुंबईला जातो आणि विधानसभेवर महायुतीचा झेंडा लावून परत येऊ असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.