‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’च्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:23+5:302021-05-21T04:12:23+5:30

पुणे : रहिवासी, व्यावसायिक आणि मनोरंजनाच्या दृष्टीने सर्वसुविधांनी उपयुक्त अशी ७०० एकरांवर ‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’ उभारण्याचा निर्णय २०१८ साली ...

'Mahalunge-Maan Hi-Tech City' gets a break | ‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’च्या कामाला ‘ब्रेक’

‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’च्या कामाला ‘ब्रेक’

googlenewsNext

पुणे : रहिवासी, व्यावसायिक आणि मनोरंजनाच्या दृष्टीने सर्वसुविधांनी उपयुक्त अशी ७०० एकरांवर ‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’ उभारण्याचा निर्णय २०१८ साली घेतला होता. या हायटेक सिटी म्हणजे टीपी स्कीममध्ये (नगर रचना) खासगी क्षेत्रातून तब्बल २३ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांची सतत होणारी बदली आणि नंतर कोरोनामुळे आता पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या प्रश्नामुळे मागील अडीच वर्षांत या हायटेक सिटीचे काम रेंगाळले आहे. पुढील महिनाभरात मंत्रालय स्तरावर बैठक होऊन लवकरच काम सुरू होईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘म्हाळुंगे-माण हायटेक सिटी’ उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत विकासकामांचे भूमिपूजन केले होते. यासाठी स्वतः पीएमआरडीए ६२० कोटी रुपये गुंतवणार होते. मात्र, टेंडर प्रक्रियेच्या पुढे काहीच काम अजून झाले नाही. या ७०० एकरांच्या मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना विकसित जमीन तसेच इतर सेवा-सुविधा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारचा करार देखील झाला नसल्याचे समोर आले आहे.

कोणती कामे होणार ?

रस्ते व दळणवळण २६० कोटी, पूलबांधणी १५ कोटी, नालेबांधणी ५० कोटी, पाणीपुरवठा ४५ कोटी, सांडपाणी व्यवस्थापन ३७ कोटी, विद्युतीकरण १२७ कोटी, सेवावाहिनी ८१ कोटी आणि नियंत्रण कक्ष उभारणीसाठी १० कोटी आदी या पायाभूत सुविधा उभारणीसाठी एकूण ६२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

चार टीपी स्कीम पुणे महापालिकेत येणार ?

पीएमआरडीएने रिंगरोडच्या मार्गावर १४ टीपी स्कीम (नगर रचना) उभारण्याच्या निर्णय घेतला आहे. यापैकी ७ टीपी स्कीम सुरुवातीला प्रस्तावित केल्या आहेत. पुणे महापालिकेत २३ गावांच्या समावेशामुळे त्यापैकी वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, मांजरी आणि होळकरवाडी या टीपी स्कीम महापालिकेत वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 'Mahalunge-Maan Hi-Tech City' gets a break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.