सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या महाळुंगे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:58 PM2021-06-28T21:58:04+5:302021-06-28T21:58:16+5:30
दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चाकण : सराईत गुन्हेगारांकडून कंपनीत शिरून धाडसी सशस्त्र दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया प्रा. ली. कुरुळी या कंपनीत हा प्रकार घडला. महाळुंगे पोलिसांनी याप्रकरणी सात सराईत पुरुषांसह २ महिला अशा एकूण नऊ दरोडेखोरांच्या सोमवारी ( दि. २८ जुन ) मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रोहन विजय सूर्यवंशी ( वय.२८ वर्षे,रा.कासारवाडी, पुणे),राहुल अंकुश सूर्यवंशी (वय.३१ वर्षे,रा.वाकड),रतन महादेव दनाने ( वय.१९ वर्षे,रा.तळेगाव दाभाडे),अब्दुल सत्तार अब्दुल करीम ( वय.२३ वर्षे, रा.दापोडी ),अन्सार जुल्फिकार खान ( वय.२५ वर्षे, रा.दापोडी ),अरबाज रइस शेख ( वय.२० वर्षे,रा.दापोडी ),अर्जुन मोहनलाल भट ( वय.२४ वर्षे,रा.चिखली ) या सात पुरुष दरोडेखोरांसह मीना अंकुश क्षीरसागर ( वय.४० वर्षे,रा.वाकड ),विध्या मनोज मगर ( वय.२३ वर्षे,रा.तळेगाव दाभाडे ) या दोन महिला दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे.तर किरण गिरी आणि हर्षद खान हे दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतीमधील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.कुरुळी या कंपनीत ( दि.२५ ) जूनच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अकरा दरोडेखोरांनी कंपनीच्या वॉल कंपाऊंडवरून आत प्रवेश करून,सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकून डांबून ठेवले.कंपनीतील महागडे तांबे,पितळ धातूचे टर्मिनल,लनग्ज,हारनेस, वायरिंग व सुरक्षा रक्षकांचे तीन मोबाईल असा २५,८७,२४७ रुपयांचा माल अशोक लेलँड कंपनीचा क्रीम कलरच्या टेम्पोमधून लुटून नेला होता.मात्र टेम्पोच्या नंबर प्लेटवर पांढरा कागद लावल्याने नंबर ओळखणे अवघड होते,परिसरातील इतर कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केल्यानंतर एका कॅमेऱ्यात टेम्पोच्या नंबर प्लेटचा पांढरा कागद गळून पडल्याचे निदर्शनास आले तसेच नंबर आढळून आला त्यावरून टेम्पोची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले होते.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी लुटलेला माल निगडी यमुनानगर येथे विक्री करत असताना,त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.यावेळी दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले तर सात पुरुष आणि दोन महिला दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.२५ लाख ७५ हजार ५४७ रुपयांचे तांबे,पितळ आदी स्पेअर पार्ट,४ लाख रुपयांचा टेम्पो,२ लाख ९० हजार रुपयांच्या सहा दुचाक्या,६८ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच चाकू,लोखंडी कटवण्या असा ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त केला आहे.
--------------