महामंडळाची घटना मूक; कारवाई नाहीच
By Admin | Published: October 1, 2015 01:09 AM2015-10-01T01:09:40+5:302015-10-01T01:09:40+5:30
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारपत्रकावर श्रीपाल सबनीस यांनी पूर्वपरवानगी न घेता महामंडळ अध्यक्षांचा फोटो प्रसिद्ध केला आहे.
पुणे : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारपत्रकावर श्रीपाल सबनीस यांनी पूर्वपरवानगी न घेता महामंडळ अध्यक्षांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या संदर्भात आलेल्या तक्रार अर्जानुसार महामंडळाच्या घटनेचा अभ्यास केला असता अशा घटना मूक असल्याचे दिसून येते. कारवाईसंदर्भात काहीही लिहिलेले नसल्याने कारवाई करता येत नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सबनीसांची उमेदवारी कायम असल्याचे ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांचा प्रचारपत्रकावर फोटो आणि मजकूर प्रसिद्ध केला आहे. ही प्रचारपत्रके ते मतदारांना पाठवीत आहेत. हा प्रकार मतदारांवर दबाव टाकणारा असल्याची तक्रार अनिल कुलकर्णी यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली.
या तक्रार अर्जाची दखल घेऊन निर्वाचन अधिकाऱ्यांनी प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना मंगळवारीच खुलासा करण्याची नोटीस बजावली. तक्रार अर्जासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, ‘‘सबनीस यांनी मंगळवारी सायंकाळीच खुलासा पाठविला, तर वैद्य यांनी आज खुलासा पाठविला आहे. सबनीस यांच्या खुलाशात म्हटले आहे की, औरंगाबाद येथे अर्ज भरल्यानंतर श्रीपाल सबनीस विचार मंचचे महेश थोरवे-पाटील यांनी अनेक साहित्यिकांच्या प्रतिक्रिया एकत्र करून प्रचारपत्रक पाठविले. वैद्य यांच्या २०१३मधील प्रस्तावनेच्या चार ओळी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांचा कुठेही उल्लेख नाही. वैद्य यांची या संदर्भात संमती घेणे नजरचुकीने राहिले आहे.
वैद्य यांनी इंग्रजीत खुलासा केला असून, सबनीस यांनी संपर्क साधला नसून संमतीही दिली नसल्याचे खुलाशात म्हटल्याचे आडकर म्हणाले.