आपत्कालीन स्थितीत महामेट्रोच्या गाड्यांमध्ये होणार संवाद : सीबीटीएस यंत्रणा असणार कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:49 PM2019-09-10T13:49:06+5:302019-09-10T13:52:47+5:30
परदेशातील प्रत्येक मेट्रो गाडीत ही यंत्रणा असते. ती पुण्यातील गाडीत जाणीवपुर्वक बसवण्यात आली आहे...
पुणे : शहराचा चेहरा बदलणाऱ्या मेट्रोच्या गाड्यांमध्ये महामेट्रो कंपनीकडून नवनवे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यात येत आहे. मार्गावर धावणाऱ्या गाड्या अडचणीच्या काळात एकमेकींशी संवाद साधतील अशी अत्याधुनिक यंत्रणा पुण्यातील मेट्रोच्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे. भविष्यात चालक नसतानाही या गाड्या धावतील अशी क्षमता त्यात असणार आहे.
सीबीटीएस (कम्यूनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम) असे या यंत्रणेचे नाव आहे. मार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक गाडीत ही यंत्रणा असेल. मेट्रोचा मार्ग फक्त दुहेरी आहे. तसेच गाडीही फक्त तीन डब्यांची आहे. तरीही गाडी जमिनीपासून २२ मीटर उंचीवर असणे, ती वेगात असणे, प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकातील तिचे थांबणे, अखेरच्या स्थानकावर वळून ( यू टर्न) पुढे जाणे, त्यामागे लगेच दुसरी गाडी असणे, गाडीतील यंत्रणा बिघडणे किंवा काही आपत्तीजनक घटना घडणे अशा बऱ्याच गोष्टी त्यात घडू शकतात. पुढे असणाऱ्या किंवा मागे असणाऱ्या गाडीला त्याची कल्पना मिळाली तर यापासून होणार अपघात टळू शकतात या विचाराने ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
परदेशातील प्रत्येक मेट्रो गाडीत ही यंत्रणा असते. ती पुण्यातील गाडीत जाणीवपुर्वक बसवण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या सिग्नलिंग विभागाचे कार्यकारी संचालक मनोज गुरूमूखी यांनी सांगितले की ही संगणकीय प्रणाली आहे. त्यात संवेदक (सेन्सर) बसवले आहेत. दोन गाड्या एकमेकींपासून विशिष्ट अंतराच्या आतमध्ये असतील तर ही प्रणाली कार्यान्वित होईल. अंतराबाबतचा संदेश या प्रणालीतून मागील गाडीला जाईल. गाडी सुरू करू नका असा हा संदेश असेल. तो ऐकला गेला नाही तर गाडी सुरूच होणार नाही इतकी ही प्रणाली अद्ययावत आहे.
त्याशिवाय गाडीला काही अडथळा निर्माण झाला असेल, गाडीमध्ये काही अडचण झाली असेल तरीही त्याप्रमाणे अशा संदेशांची देवाणघेवाण दोन गाड्यांमध्ये होईल. याच प्रणालीत आणखी सुधारणा केली तर गाडी चालकरहित करणेही शक्य असल्याचे गुरूमूखी यांनी सांगितले. चालकरहित गाडी दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात चालक असतो, मात्र तो फक्त निगराणी करतो व दुसऱ्या प्रकारात गाडी पुर्ण चालकरहित असते. पुण्यातील गाड्या पहिल्या प्रकारात होणे भविष्यात शक्य आहे, असे गुरूमूखी यांनी सांगितले.