फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
By श्रीकिशन काळे | Published: May 10, 2024 04:23 PM2024-05-10T16:23:21+5:302024-05-10T16:23:45+5:30
आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, श्रीवत्समधील मुले, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व भाविकांना देण्यात येणार
पुणे : गणरायाच्या भोवती आंब्यांची केलेली आरास...मंदिरामध्ये आंब्याचा घमघमाट पसरला होता. सनई व मंगलाष्टकांचे मंगल स्वर आणि लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप अशा वातावरणात अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. सोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अथर्व केदारी, पिनाक भट, बापू किकले, रवी पठारे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हे तिसरे वर्ष आहे. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.