संत तुकाराम महाराजांच्या ३३८ वा पालखी सोहळ्यानिमित्त महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:13 AM2023-06-10T09:13:21+5:302023-06-10T09:13:51+5:30
मंदिरात पहाटे अडीच वाजले पासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
देहूगाव : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शाळा मंदिर, या ठिकाणची महापूजा पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरात पहाटे अडीच वाजले पासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री संत तुकाराम महाराज मंदिर , मुख्यमंदिर, ज्या ठिकाणाहून पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले जाणार आहे. अशा भजनी मंडपाला, हनुमान मंदिर गरुड मंदिराला, राममंदिर ,महाद्वार या सर्व ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आलेले भावीक महिला दर्शन झाल्यानंतर श्री राम मंदिरासमोरील मोकळ्या जागेत फुगड्यांचा खेळ खेळत होते. दरम्यानच्या काळात दर्शन बारी पालखी मार्गावरील श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
वारीसोबत चाल चालणाऱ्या दिंड्या सकाळपासून प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराच्या आवारात येत होत्या. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरांमध्ये आपली प्रदक्षिणा पूर्ण करून उत्तर दरवाजाने पुन्हा बाहेर जात होत्या. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. अंघोळीनंतर पूजा पाठ करण्यात भाविक मग्न झाले होते. आबाल वृद्धांनी इंद्रायणी नदीकाठी अंघोळीसाठी मोठी गर्दी केली होती.