भीमाशंकर येथे महारूद्र स्वाहाकार
By admin | Published: April 21, 2017 05:59 AM2017-04-21T05:59:10+5:302017-04-21T05:59:10+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चार दिवसांचा महारूद्र स्वाहाकार व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. संस्थानच्या वतीने दिला जाणारा
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चार दिवसांचा महारूद्र स्वाहाकार व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. संस्थानच्या वतीने दिला जाणारा ज्योतिर्लिंग पुरस्कार या वर्षी अथर्ववेद पंडित देशिक शास्त्री नारायण कस्तुरे व हभप विश्वनाथमहाराज लवकरे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना देण्यात आला.
विश्वात सुख, समृद्धी व शांतता राहावी यासाठी येथील ग्रामस्थ चार दिवस रूद्र स्वाहाकाराचा कार्यक्रम आयोजित करतात. या वर्षी दि. १७ ते २० एप्रिलदरम्यान हा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे हे ३९ वे वर्ष होते. स्वाहाकार काळात मंदिर चोवीस तास उघडलेले असते. शिवलिंगावर संतत जलधारा व महारूद्र पठण सुरू असते. दररोज होमहवन, रूद्राभिषेक, प्रवचन, आरती, महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. या वर्षी योगेश गवांदे हे रूद्र स्वाहाकारासाठी यजमान म्हणून बसले होते. या कार्यक्रमासाठी चिंचवड, नरसोबाचीवाडी, आळंदी अशा अनेक धार्मिक स्थळांचे ब्रह्मवृंद येतात. चार दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात दररोज महाप्रसाद असतो. या महाप्रसादासाठी भीमाशंकर परीसरातील गावांमधून धान्य गोळा केले जाते.
या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पूर्णाहुती स्वाहाकार होऊन पालखी सोहळा निघतो. याही वर्षी उत्साहात पालखी सोहळा झाला. पालखी भीमाशंकर मंदिरापासून तर कोकणकडा व तेथून कमलजामाता मंदिरात आणली जाते. येथे महाआरती होऊन सांगता होते.
या वेळी उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, वेदमूर्ती मधुकर गवांदे, विश्वस्त रत्नाकर कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरुजी, प्रशांत काळे, दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे, गणपत कौदरे, रामचंद्र शिर्के इत्यादी उपस्थित होते.