Maharashtra: जूनमध्ये राज्यात १०६ टक्के पाऊस, पेरण्या मात्र ५६ टक्केच! असमान वितरणचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:53 AM2024-07-02T10:53:00+5:302024-07-02T10:53:22+5:30
पावसाअभावी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरण्या झाल्या नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी राजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.....
पुणे : राज्यात जूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असला तरी त्या तुलनेत पेरण्या केवळ ५६ टक्के झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसाअभावी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरण्या झाल्या नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी राजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्याची जूनची पावसाची सरासरी २०७.६ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात २२१.४ मिलिमीटर अर्थात १०६.६५ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक १३६ टक्के पाऊस संभाजीनगर विभागात झाला आहे. त्या खालोखाल नाशिक विभागात ११४ मिलिमीटर, तर अमरावती विभागात ११० टक्के पाऊस झाला आहे. सर्वांत कमी ७० टक्के पाऊस नागपूर विभागात झाला आहे. कोकणात ९४.९६ टक्के, तर पुणे विभागात १०६.२६ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाखालील पेरणी आतापर्यंत ३० लाख ९७ हजार ९१७ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या ७५ टक्के झाली आहे. कापूस पिकाची पेरणी २७ लाख ६९ हजार ६७१ हेक्टर अर्थात ६६ टक्क्यांवर पोहोचली आहे. मराठवाडा व विदर्भात समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस या पिकांखालील पेरण्या जास्त झाल्या आहेत. त्या तुलनेत कोकणात पावसाने सरासरी गाठली असली तरी असमान वितरणामुळे भात खाचरात अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. आतापर्यंत केवळ आठ टक्के क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झाली आहे.
कापूस, सोयाबीननंतर मकाची पेरणी ५ लाख ८८ हजार ४५२ हेक्टरवर झाली असून, ती सरासरीच्या ६६ टक्के इतकी आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्याने मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या पेरण्यादेखील बऱ्यापैकी झाल्या आहेत. मुगाची पेरणी १ लाख ३८ हजार ८५३ हेक्टर अर्थात ३५ टक्के, तर उडीद पिकाची पेरणी २ लाख ९ हजार ५२१ हेक्टरवर झाली असून, ती सरासरीच्या ५७ टक्के इतकी आहे. तूर पिकाखालील क्षेत्र ६ लाख ६८ हजार २७७ हेक्टर अर्थात ५२ टक्के इतके पेरून झाले आहे.
विभागनिहाय पेरणी
कोकण ३.९९
नाशिक ४६.१०
पुणे ७१.८७
कोल्हापूर ५१.३२
संभाजीनगर १९.६५
लातूर ६६.८२
अमरावती ५२.९२
नागपूर ३४.३९
एकूण ५६ टक्के