येत्या दहा दिवसांत मविआचे जागावाटप; एकवाक्यतेने निर्णय घेऊ - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:31 AM2024-09-23T10:31:30+5:302024-09-23T10:31:46+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे.

Maharashtra assembly election 2024 Allotment of MVA seats in next ten days | येत्या दहा दिवसांत मविआचे जागावाटप; एकवाक्यतेने निर्णय घेऊ - शरद पवार

येत्या दहा दिवसांत मविआचे जागावाटप; एकवाक्यतेने निर्णय घेऊ - शरद पवार

बारामती (जि. पुणे) : राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. ते एकत्र येऊन निर्णय घेतील. या तीन पक्षांतील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी, यासंबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीची जागावाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मांडली. पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठांची टीम मुलाखती घेतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही.

त्यापूर्वी माझ्यासारख्याने मत व्यक्त करणे योग्य नाही. सध्या कुठेही गेले, तरी निवडणूक लढवणारे इच्छुक येऊन भेटत आहेत. आमची आघाडी आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत, असेही ते म्हणाले.

जात, धर्म काही असले तरी आपण भारतीय' 

मराठा व धनगर आरक्षणासंबंधी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढण्याचे काही कारण नाही. जात, धर्म काही असले तरी आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत.

आपल्या सर्वांमध्ये सामंजस्य कसे करता येईल, यासंबंधीची भूमिका या क्षेत्राचे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारनेसुद्धा अशा प्रश्नांसंबंधी लोकांना विश्वासात घेऊन त्याची पूर्तता कशी करता येईल, वातावरण चांगले कसे राहील, याकडे लक्ष देऊन खबरदारी घेतली पाहिजे.
 

Web Title: Maharashtra assembly election 2024 Allotment of MVA seats in next ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.