Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:24 PM2024-11-23T20:24:47+5:302024-11-23T20:25:29+5:30

Pune Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पुणे जिल्ह्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Result Live Updates set back for ncp sharad pawar in pune district | Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

NCP Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज लागलेला निकाल हा राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचे मजबूत समजले जाणारे अनेक बालेकिल्ले आजच्या निकालातून उद्ध्वस्त झाले आहेत. पुणे जिल्हा हा पारंपरिकदृष्ट्या शरद पवार यांचा गड मानला जात होता. मात्र अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. या फुटीचे प्रतिबिंब आजच्या निकालातून दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील अवघ्या एका मतदारसंघात शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला यश मिळालं आहे. 

शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पुणे जिल्ह्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. फक्त वडगाव शेरी या मतदारसंघातून बापू पठारे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांचा पराभव करत विजयाची तुतारी वाजवली. अन्यथा बारामतीतून शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, शिरूरमधून हर्षवर्धन पाटील, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, आंबेगावातून देवदत्त निकम, हडपसरमधून प्रशांत जगताप, खडकवासल्यातून सचिन दोडके यांच्यासह अन्य उमेदवारांना  पराभवाचा सामना करावा लागला. 

शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या उमेदवारांच्या पराभवाचा चंग बांधला होता. या उमेदवारांना पाडा, पाडा, पाडा म्हणत पवारांनी रान पेटवलं होतं. मात्र लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या अन्य योजनांच्या बळावर सत्ताधारी महायुतीच्या बाजूने चमत्कार झाल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचीही मोठी पीछेहाट झाली आहे. भोर-वेल्हा-मुळशी या मतदारसंघातून संग्राम थोपटे, पुरंदरमधून संजय जगताप, कसब्यातून रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या पदरी पराभव आला आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Result Live Updates set back for ncp sharad pawar in pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.