Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात 'सेम टू सेम' उमेदवारांची नावे; मताधिक्यावर फारसा परिणाम नाही, डावपेच फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:35 PM2024-11-24T12:35:55+5:302024-11-24T12:36:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result पर्वतीत २ अश्विनी कदम, वडगाव शेरीत २ बापू पठारे, आंबेगावात २ देवदत्त निकम; उमेदवाराला पराजित करण्याचा डावपेच फसला
पुणे : पुणे शहरातील पर्वती, वडगावशेरी आणि जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एकाच नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, पण आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता, पर्वती आणि वडगावशेरी मतदारसंघात मिळालेली मते पाहता, विजयी उमेदवारांच्या मताधिक्यावर फारसा परिणाम झालेला नाही.
पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अश्विनी नितीन कदम यांना ६२ हजार ८२१ मते मिळाली. पहिल्या अपक्ष अश्विनी नितीन कदम यांना ३७८, तर दुसऱ्या अपक्ष अश्विनी अनिल कदम यांना २९४ मते मिळाली. पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ १ लाख १७ हजार मते मिळवत विजयी झाले.
राजकारणात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराजीत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. त्यातील एक डावपेच म्हणजे मतदारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि त्यासाठी सारख्या नावाच्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास भाग पाडणे हा होय. विधानसभा निवडणुकीत ही क्लृप्ती मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. त्यानुसार, मतदारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी सारख्या नावाच्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास भाग पाडले होते.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) बापूसाहेब पठारे यांना १ लाख ३३ हजार ६७९ मते मिळाली, पण श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे यांनी केवळ १ हजार २६० मते मिळाली. पर्वती आणि वडगाव शेरीमध्ये सेम टू सेम नावे असलेल्या उमेदवाराचा फारसा परिणाम झाला नाही.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम यांना २हजार ९६५ मते मिळाली आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांचा १ हजार ५०० मतांनी विजय झाला आहे.