वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 05:21 PM2024-10-24T17:21:38+5:302024-10-24T17:32:05+5:30

वरिष्ठांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जात आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A big twist in Vadgaon Sheri A word from seniors to both aspirants in the grand coalition who will get the candidacy | वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?

वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?

Wadgaon Sheri Vidhan Sabha ( Marathi News ) : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण या मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासह भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली असून वरिष्ठांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार आणि उमेदवारी नाकारलेला नेता बंडखोरी करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

वडगाव शेरीची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यास या मतदारसंघातही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांना पक्षाने लोकसभेचा शब्द दिला होता. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. त्याआधीच भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. ही जागा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मुळीक यांची परत अडचण झाली आहे. त्यांनी पक्षाकडे ही जागा अजित पवार यांच्याकडून मागून घ्यावी, अशी मागणी केली. ती पूर्ण झाली नाही, तर मुळीक यांच्याकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यता आहे.

"प्रचाराला सुरुवात, तिकीट मलाच मिळणार"

"वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मलाच मिळेल. अजितदादा आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांशी माझं फोनवरून बोलणं झालं असून त्यांनी मला तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या यादीत माझं नाव आलं नसलं तरी आज रात्रीपर्यंत दुसरी यादी येईल आणि त्यामध्ये माझं नाव असेल," असा दावा आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे.

वडगाव शेरी मतदारसंघाचा इतिहास

विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत हवेली, बोपोडी, भवानी पेठ या मतदारसंघांचा मिळून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ तयार झाला, वर्ष २००९ मध्ये इथे पहिली निवडणूक झाली. आतापर्यंत इनमिन ३ निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते शिवसेनेचे अजय भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजेंद्र एंडल, बसपकडून हुलगेश चलवादी, तर आरपीआय (आ) कडून सय्यद अफसर इब्राहिम रिंगणात होते. पठारे यांनी एकतर्फी विजय मिळवला, त्यांचे मताधिक्य तब्बल ३३ हजार ११६ मतांचे होते. भोसले होते नानापेठेतील, तर पठारे स्थानिक, त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरचा या प्रचाराने जोर धरला. त्याचा फायदा पठारे यांना झाला. पठारे यांना ७२,०३४ मते मिळाली, भोसले यांना ३८,९१८ मते मिळाली. 

दुसऱ्या निवडणुकीत सर्व राजकीय समीकरणे बदलली. आघाडी-युती तुटल्याने सर्व पक्ष स्वतंत्र लढले. त्याचा परिणाम या मतदारसंघावर झाला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे या सर्वांनी आपापले स्वतंत्र उमेदवार दिले. निवडणूक चांगलीच रंगतदार झाली. यात राष्ट्रवादीकडून बापूसाहेब पठारे, शिवसेनेकडून सुनील टिंगरे, भाजपकडून जगदीश मुळीक, काँग्रेसकडून चंद्रकांत छाजेड, मनसेकडून नारायण गलांडे है उमेदवार मैदानात होते.
 
भाजपचे जगदीश मुळीक यांनी शिवसेनेचे सुनील टिंगरे यांचा अल्प मतांनी (४३२५) पराभव केला. मुळीक यांना ६६,९०८ मते मिळाली, टिंगरे यांना ६१,५८३ मते पडली. आमदार पठारे तिसऱ्या क्रमांकावर (४४,४८०) गेले. मनसेचे नारायण गलांडे (१८,८३०) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे चंद्रकांत छाजेड (१२,४९७) राहिले. 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून  बापूसाहेब पठारे रिंगणात असून त्यांना महायुतीकडून कोण आव्हान देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A big twist in Vadgaon Sheri A word from seniors to both aspirants in the grand coalition who will get the candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.