शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:21 PM2024-11-14T14:21:40+5:302024-11-14T14:23:55+5:30

शरद पवार यांनी निकम यांना निष्ठेचे फळ देत उमेदवारी दिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dilip Walse Patil first reaction on ncp sharad pawar ambegaon speech | शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

Dilip Walse Patil ( Marathi News ) : "दिलीप वळसे पाटील यांनी आम्हा लोकांची साथ सोडली. त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारांना शिक्षा करायची असते. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वळसे पाटलांचा १०० टक्के पराभव करा," असं कार्यकर्त्यांना आवाहन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आंबेगावमधील उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. शरद पवार यांच्या या टीकेला आता वळसे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

"आपल्या विरोधी उमेदवारांची नुकतीच सभा पार पडली. या सभेत बरंच काही बोललं गेलं. मात्र मी त्याबाबत आज बोलणार नाही. १८ तारखेला आपल्या सांगता सभेतून मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे," अशी भूमिका दिलीप वळसे पाटील यांनी मांडली आहे. तसंच यावेळी त्यांनी शरद पवारांवर निशाणाही साधला आहे. "आपलं पाणी नगर जिल्ह्याला जाणार की नाही, याबाबत आजच्या सभेत पवारसाहेबांनी एक शब्दही उच्चारला नाही," असं वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे निवडणुकीच्या सांगता सभेत शरद पवारांच्या टीकेला नेमकं कसं प्रत्युत्तर देतात आणि यंदा आंबेगावमध्ये कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आंबेगावमध्ये होणार अटीतटीची लढत

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. मागील सात निवडणुकांमध्ये चढत्या मताधिक्याने विजयी झालेले दिलीप वळसे-पाटील सलग आठव्यांदा विधानसभा लढवत आहेत. महायुतीचे पाठबळ त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी सभापती देवदत्त निकम हे निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाच निकम यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी डावल्यानंतर ते अपक्ष उभे राहून विजयी झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर निकम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी निकम यांना निष्ठेचे फळ देत उमेदवारी दिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dilip Walse Patil first reaction on ncp sharad pawar ambegaon speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.