वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:35 PM2024-10-31T13:35:04+5:302024-10-31T13:36:49+5:30
शरद पवार यांनी देवदत्त निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला हवं, याबाबतचा कानमंत्र दिला
NCP Sharad Pawar ( Marathi News ) :आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बारामती इथं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिवाळीनिमित्त भेट घेतली. यावेळी पवार यांनी देवदत्त निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला हवं, याबाबतचा कानमंत्र दिला आणि आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, "देवदत्त निकम यांच्या रुपाने तुम्हाला एक सक्षम नेतृत्व मिळालं आहे. तुम्ही सर्व आत्मविश्वासाने भक्कम आहात. मात्र तुम्ही गाफील राहू नका. कारण समोरच्या लोकांना कळलं आहे की तुम्ही मनात आणल्यावर काय करू शकता. त्यामुळे ते सर्व ताकदीने साधन-संपत्ती वापरणार आहेत, सत्तेचा वापर करणार आहेत. तुम्ही सर्व फाटक्या खिशाचे असला तरी प्रामाणिक आणि निष्ठावान आहात. तुम्ही सर्वांनी ही निवडणूक चिकाटीने लढली तर यश मिळेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. मात्र अतिविश्वासाने या निवडणुकीला सामोरे जाऊ नका. आपली सुरुवात एका मतापासून आहे आणि एकापासून सुरुवात करून शंभरातील सत्तरचा आकडा आपल्याला गाठायचा आहे. या पद्धतीने विचार करून निवडणुकीला सामोरे जा," असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
"प्रत्येक गावात, वाडी-वस्त्यावर जा आणि तरुण वर्ग असेल, वृद्ध, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी अशा प्रत्येक घटकाशी संपर्क साधा. लोकशाहीमध्ये काही वेळा आम्हा लोकांना वाटतं ही सर्व ताकद आपली आहे. मात्र लोकशाहीत आम्हाला लोकांची ताकद नसते तर सर्व ताकद तुम्हा जनतेची असते. लोक मोठं करत असतात. लोकांनी ठरवलं तर ते प्रमाणिक माणसाला मोठं करतात," अशा शब्दांत पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे.
बंडावरून दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. यावरून वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, "दिलीप वळसे पाटील यांची वडील दत्तात्रय वळसे पाटील हे माझे जवळचे सहकारी होते. त्यांनी शेवटपर्यंत माझी प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांनीच माझ्या मुलाला तुमच्या कार्यालयात काम करण्याची संधी द्या, अशी विनंती केली. त्यानुसार मी दिलीप वळसे पाटलांना माझ्यासोबत ठेवलं, नंतर आमदारही आणि विविध खात्यांचं मंत्री केलं. तसंच देशाच्या साखर उद्योगाशी संबंधीत संस्थेचं अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेतही काम करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी काय केलं? त्यांनी जो निर्णय घेतला तो सामान्य जनतेला आवडलेला नाही," असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देवदत्त निकम यांना ताकद देण्याचं आवाहन केलं आहे.