आंबेगावात गुरू-शिष्याची लढत: 'पवार फॅक्टर' गेमचेंजर ठरणार? अशी आहे मतदानाची टक्केवारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 11:22 AM2024-11-21T11:22:40+5:302024-11-21T11:27:51+5:30

शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचं आवाहन केलं होतं.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad Pawar factor will be a game changer in ambegaon assebly seat voting percentage update | आंबेगावात गुरू-शिष्याची लढत: 'पवार फॅक्टर' गेमचेंजर ठरणार? अशी आहे मतदानाची टक्केवारी!

आंबेगावात गुरू-शिष्याची लढत: 'पवार फॅक्टर' गेमचेंजर ठरणार? अशी आहे मतदानाची टक्केवारी!

Ambegaon Vidhan Sabha ( Marathi News ) :आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. आंबोगाव विधानसभेसाठी ७०.५६ टक्के झाले मतदान आंबेगाव विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३१४२५२ मतदारांपैकी मतदान २२१७४४ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदान ११५५६६ व स्त्री मतदान १०६१७३ आणि इतर ५ असे एकूण मतदान २२१७४४ मतदान झाले असून एकूण मतदानच्या ७०.५६ टक्के इतके मतदान झाले. 

विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचं आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून नक्की कोण बाजी मारणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आंबेगाव मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. थंडीचा कडाका असल्याने मतदान केंद्रावर सकाळी तुरळक मतदार मतदानासाठी आले होते. मात्र, ऊन वाढू लागले आणि मतदानाला येणाऱ्यांची संख्या वाढली. उमेदवारांनी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. वाडी-वस्त्यांवर जाऊन मतदार वाहनातून आणले जात होते. शिवाय, प्रशासनाकडून मतदान स्लीप घरपोच केल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांनी जरी मतदान केंद्राबाहेर बूथ मांडले असले, तरी मतदार तेथे न थांबता थेट मतदानासाठी केंद्रात जात होते. परिणामी, दोन्ही पक्षांच्या बुथवर मतदारांची गर्दी दिसली नाही. महिलाही मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. 

मतदान केंद्राबाहेर असलेल्या सेल्फी पॉइंटमध्ये अनेकांनी सेल्फी काढली. विशेषतः तरुण व नवतरुण मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना घरी मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने केली होती. तरीही ज्यांचे मतदान राहिले, असे वृद्ध व दिव्यांग आवर्जून मतदान करण्यासाठी आले होते. मतदान यादीत चुकीचा क्रमांक असणे, अशा तक्रारी काही ठिकाणी आल्या. मंचर येथील मतदान केंद्रावर अवधूत घुले हा आई चंद्रभागा यांच्यासह मतदानासाठी आला होता. मात्र, तुमचे नाव दुसरीकडे गेल्याचे त्याला सांगण्यात आले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरगुडसर येथे, तर देवदत्त निकम यांनी नागापूर येथे सकाळच्या वेळी कुटुंबीयांसह मतदान केले. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी मंचर येथे, तर म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे मतदान केले.

पडले बंद पाबळ येथील २७५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी मतदान यंत्र बंद पडले. तांत्रिक टीम तेथे दाखल झाली. मात्र, यंत्र एरर दाखवत असल्याने पूर्ण संच बदलण्यात आला. त्यानंतर सव्या एक वाजता मतदान प्रक्रिया तेथे पुन्हा सुरू झाली. पहिल्या यंत्रामध्ये ११४ मतदान झाले. यंत्र बदलल्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू होते.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad Pawar factor will be a game changer in ambegaon assebly seat voting percentage update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.