दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:18 PM2024-11-04T16:18:47+5:302024-11-04T16:25:31+5:30

दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The equation changed at the last minute in Daund Jagdale Tambe Sheikh withdrew | दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

Daund Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघही याला अपवाद नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचेदौंडमधील उमेदवार वीरधवल उर्फ बाबा जगदाळे यांनी आज आपला उमेदवार अर्ज मागे घेतला. तसंच राष्ट्रवादीचे नेते बादशाह शेख, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास इच्छुक असलेले राजाभाऊ तांबे यांनीही अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात असा पारंपरिक सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

दौंडमध्ये पंचरंगी लढत होईल असं कालपर्यंत वाटत होतं. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वेगवान हालचाली झाल्या आणि तीन महत्त्वाच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. महायुतीच्या समीकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वीरधवल जगदाळे यांनी विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार असलेल्या राहुल कुल यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळू, असं वीरधवल जगदाळे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांचे कार्यकर्ते हे पारंपरिकदृष्ट्या थोरात यांचे मतदार असल्याने जगदाळे आणि कुल यांच्यात वोट ट्रान्सफर होणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तांबे-शेख यांचा रमेश थोरातांना पाठिंबा! 

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राजाभाऊ तांबे आणि बादशाह शेख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत रमेश थोरात यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे थोरात यांची राजकीय ताकद वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे दौंडच्या निवडणुकीतील रंगत वाढली असून राहुल कुल आणि रमेश थोरात या थेट लढतीत कोण विजयी होतं, हे पाहावं लागेल.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The equation changed at the last minute in Daund Jagdale Tambe Sheikh withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.