Maharashtra Board SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल
By प्रशांत बिडवे | Published: June 2, 2023 11:23 AM2023-06-02T11:23:47+5:302023-06-02T11:36:25+5:30
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 - दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर खालील संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करा अर्ज
दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यास विषयाची गुण पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागवून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन माध्यमातून स्वत:, शाळांमार्फत http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. गुण पडताळणीसाठी दि. ३ ते १२ जून तसेच छायाप्रत मागविण्यासाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. डेबीट, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे.