Maharashtra | मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:02 PM2023-03-04T16:02:15+5:302023-03-04T16:02:50+5:30
सध्या पुण्यात सकाळी व सायंकाळनंतर किमान तापमान कमी असल्याने गारवा जाणवत आहे...
पुणे : राज्यात बऱ्याच ठिकाणी तुरळक हलक्या स्वरुपातील सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ५ व ७ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या पुण्यात सकाळी व सायंकाळनंतर किमान तापमान कमी असल्याने गारवा जाणवत आहे.
कोकण, गोवा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात किमान तापमान साधारण १६ अंश सेल्सिअस असल्याने सकाळी व रात्री गारवा जाणवत आहे. तसेच दिवसभरही ढगाळ वातावरण असल्याने दुपारी खूप कडक उन्हाचा त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसळीकर म्हणाले, ‘‘सध्या पुण्याच्या हवामानाचा वेगळा अनुभव येत आहे. एकीकडे गारवाही जाणवत आहे आणि दुसरीकडे दुपारी उन्हाचा कडाका वाढत आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.’’