महाराष्ट्रात हुडहुडी! पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 09:32 AM2023-01-13T09:32:30+5:302023-01-13T09:32:38+5:30
राज्यात पुढील आठवड्यात थंडीच्या लाटेची शक्यता
पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा प्रभाव कायम आहे. पुढील २४ तासांत यात अंशत: घट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात गुरुवारीही नीचांकी तापमान जळगाव येथे ७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. किमान तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज आहे.
पुढील आठवड्यात १६, १७ जानेवारीनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र, ईशान्य विदर्भ व उत्तर मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीत फारशी वाढ झाली नसून, काही ठिकाणी किमान तापमानात अंशतः वाढ झाली आहे. राज्यात नीचांकी तापमान पुन्हा जळगाव येथेच ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यातही तापमान ८.३ अंश सेल्सिअसवर पारा उतरला होता. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्यात अंशतः वाढ झाली आहे. राज्याच्या अन्य भागांतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे हुडहुडी कायम आहे.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “उत्तरेत पश्चिम चक्रावाताची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम राज्यातील थंडीवर जाणवणार नाही. पुढील २४ तासांत तापमानात काहीशी वाढ होईल. मात्र, त्यानंतरच्या काळात किमान तापमानाची स्थिती सारखीच राहील. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत थंडी कायम राहील.” पुणे शहरात येत्या दोन दिवसांत किमान तापमान ९ ते १० अंशांपर्यंत तर कमाल तापमानात ३० अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. १६, १७ जानेवारीनंतर यात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्र, ईशान्य विदर्भ अर्थात गोंदिया गडचिरोली व उत्तर मराठवाडा अर्थात औरंगाबाद, जालना भागांत थंडीत वाढ होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी थंडीच्या लाटेचाही अंदाज असल्याचे काश्यपी यांनी सांगितले.