Maharashtra: थंडी वाढणार, फेब्रुवारीपर्यंत हिवाळा हंगाम पूर्ण करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:40 AM2024-02-19T11:40:44+5:302024-02-19T11:41:11+5:30
उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिमी झंझावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे...
पुणे : थंडीचा कडाका कमी होईल असे वाटत असताना पुन्हा थंडीने नागरिक गारठणार आहेत. सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमान नोंदवले जात असून, त्यात चढ-उतार होत आहे. शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरू पाहणारी, फेब्रुवारीअखेरपर्यंतची हिवाळ्यातील थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिमी झंझावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे. उत्तर भारतात त्यामुळे धुक्याचे प्रमाणही आता कमी होऊन दृश्यमानताही तेथे सुधारली आहे.
संपूर्ण उत्तर भारतात आजपासून (दि.१८) पुढील ५ दिवस म्हणजे २२ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फवारी व गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खान्देशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २७० किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे ‘पश्चिमी’ वाऱ्यांचे वहन अजूनही टिकून आहे. यामुळे महाराष्ट्राकडे थंडी वाढण्याचा खंडित का होणारा स्रोत टिकून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात, त्यामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, पहाटेच्या किमान तापमानात घट होईल. दि. २१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ३ दिवसांत पुन्हा काही जिल्ह्यांत मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे. मराठवाडा व विदर्भात मात्र दरम्यानच्या काळात पहाटेचे किमान तापमान सरासरीइतकेच राहून तेथे त्या प्रमाणातच थंडी जाणवेल, असेही खुळे यांनी सांगितले आहे.