Maharashtra: उत्तरेकडे थंड वाऱ्याची लाट, महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार
By श्रीकिशन काळे | Published: February 1, 2024 03:37 PM2024-02-01T15:37:17+5:302024-02-01T15:37:46+5:30
दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे...
पुणे : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. पुण्यामध्ये या हंगामात दुसऱ्यांदा किमान तापमान घसरण पहायला मिळाली असून, गुरूवारी हवेलीला ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर शिवाजीनगरमध्ये १०.९ अंश सेल्सिअस तापमान होते. दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार पहायला मिळत आहे. आता दोन दिवसांमध्ये दुपार लख्ख उन्ह पडत असल्याने पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळत होता. पण गुरूवारपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. देशाच्या पश्चिमी भागात वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याची वाटचाल पुर्वेकडे आहे. एक प्रभावी चक्रीय हवा राजस्थानमध्ये तयार झाली आहे. तसेच उत्तर भारतामध्येही अशीच स्थिती असल्याने महाराष्ट्रात आर्द्रता येत आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. ३ फेब्रुवारीपासून किमान तापमानात आणखी तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पुण्यात आकाश निरभ्र राहील. ३ व ४ फेब्रुवारी रोजी अंशत: आकाश ढगाळ राहतील. ४८ तासांमध्ये २ डिग्रीने किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यामुळे किमान तापमानात ३ डिग्रीने घट होईल. परिणामी दिवसाही थंडी जाणवार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यमी म्हणाले, पुण्यात उद्या (दि.२) देखील किमान तापमानात घट होईल. हे किमान तापमान १० अंशाच्या खाली जाईल. शिवाजीनगरा सिंगल डिजिटवर तापमानाची नोंद होऊ शकते. गुरूवारी शिवाजीनगरला १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.’’
शहरातील किमान तापमान
शिरूर : ८.७
हवेली : ९.०
एनडीए : ९.८
लोणावळा : १०.०
शिवाजीनगर : १०.९
पाषाण : १२.०
कोरेगाव पार्क : १६.३
मगरपट्टा : १७.१
वडगावशेरी : १८.४