एकनाथ शिंदे बंड: पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:25 AM2022-06-29T09:25:13+5:302022-06-29T09:28:38+5:30
हे आदेश १२ जुलैपर्यंत असणार...
पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्यांवर गदा आली आहे. शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा, साप्ताहिक सुट्या रद्द केल्या आहेत. हे आदेश १२ जुलैपर्यंत असणार आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. परिणामी, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पुण्यातही आमदारांची कार्यालये फोडण्याचा प्रकार घडला. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध बॅनरबाजी केल्याने त्यातून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुढाकार घेत सर्व बॅनर, होर्डिंग एका दिवसात काढून टाकली. शहरात होणाऱ्या राजकीय पक्षांचे मेळावे, आंदोलने याकरिता मोठा बंदोबस्त लावून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.