Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यात निर्णायक ठरणार १५ हजार टपाली मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:12 PM2019-10-16T13:12:41+5:302019-10-16T13:28:18+5:30
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांतून १४ हजार ६२३ टपाली मतपत्रिकांची मागणी..
नीलेश राऊत -
पुणे : टपालाद्वारे पाठविण्यात आलेले मतदान हे एकूण झालेल्या मतदानाच्या प्रमाणात नगण्य असले, तरी अटी-तटीच्या लढतीत या टपाली मतांची भूमिका ही नेहमीच निर्णायक राहिली आहे़. अशावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेल्या हजारो प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पोलिसांना स्वत:चे मतदान करण्यासाठी वेळ नसतो. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांतून १४ हजार ६२३ टपाली मतपत्रिकांची मागणी झाली असून, यापैकी ६५५ जणांनी आपले मतदान टपालेद्वारे पाठविलेही आहे़.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदानदिनाच्या अगोदर सात दिवस म्हणजे, १४ ऑक्टोबरपर्यंत टपाली मतपत्रिका मागणीकरिता प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मुदत देण्यात आली होती़. या मागणीनुसार संबंधितांना या मतपत्रिका पाठविण्यात आल्या असून, मतमोजणीच्या दिवशी (२४ ऑक्टोबरपर्यंत) सकाळी आठपर्यंत मतमोजणी केंद्रावर आलेल्या या टपाली मतपत्रिका मतमोजणीत घेतल्या जाणार आहेत़. दरम्यान, या टपाली मतपत्रिका मागविण्याच्या मुदतीच्या अंतिम दिवशीच म्हणजे, १४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाकडे ६५५ टपाली मतदान प्राप्त झाले आहे़. निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजाविताना नियुक्तीच्या ठिकाणीच मतदान करता यावे, याकरिता १ हजार २२४ जणांनी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र (ईडीसी) मागणी केली असून, त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आला आहे़. यात इडीसीकरिताचे सर्वाधिक अर्ज हे जिल्ह्यातील जुन्नर (प्राप्त अर्ज ५७८) व इंदापूर (अर्ज ३९५) विधानसभा मतदार संघातून, तर शहरात कोथरूड (१८१) विधानसभा मतदारसंघातून आले आहेत़. तर, सोळा मतदार संघांतून एकही मागणी झालेली नाही़. दुसरीकडे टपाली मतपत्रिकेची सर्वाधिक मागणी ही दौंड, बारामती व इंदापूर मतदारसंघातून आली आहे, तर सर्वांत कमी मागणी ही पुणे कॅन्टोमेंटमध्ये आलेली आहे, तर जिल्हा प्रशासनाकडे हडपसर मतदारसंघातून ४९३ व पुरंदर मतदारसंघातून १०० टपाली मतदान १४ आॅक्टोबरपर्यंत प्राप्त झाले आहे़.
.........
जिल्ह्यात सुमारे ६५ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सुमारे ६५ हजार प्रशासकीय कर्मचारी कार्यरत आहेत़. यापैकी पुणे जिल्ह्यात मतदार यादीत नाव असलेल्यांपैकी १५ हजार ८४७ जणांनी टपाली मतदान, तर निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र (ईडीसीकरिता) मागणी केली आहे़. याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतील रहिवासी असलेले तथा पुण्यात कार्यरत असलेल्यांपैकी अनेकांनी आपल्याला आपल्या मतदारसंघात मतदान करण्याकरिताही टपाली मतपत्रिका अर्ज संबंधित जिल्ह्यांकडे दाखल केलेले असून, हा आकडाही मोठा आहे़. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन टप्प्यांतील मतदानात पुणे जिल्ह्यात २० हजार ५२७ जणांनी टपाली मतदान, तसेच ईडीसीद्वारे मतदान केले होते़, तर ज्या सैनिकांनी मतपत्रिका मागविल्या होत्या, त्यापैकी ५७ टक्के मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या़.
..........
मतदानापासून एकही मतदार वंचित राहता कामा नये म्हणून निवडणूक आयोगाकडून प्रयत्न होत आहे़. याच घोषवाक्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़. यास उत्तम प्रतिसाद प्रशासन, तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मिळाला आहे़ - सुनील गाढे, समन्वय अधिकारी, टपाली मतपत्रिका पुणे जिल्हा़
.......