महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:27 PM2019-10-21T15:27:41+5:302019-10-21T15:30:47+5:30
Baramati Election 2019 : बारामतीत ठरले कौतुकाचा विषय..
बारामती : बारामती शहरातील एमईएस हायस्कुलच्या मतदारसंघात स्वत: कार चालवित मतदानासाठी पोहचलेले ९६ वर्षीय आजोबा कौतुकाचा विषय ठरले. शासनाने अनेक प्रयत्न करुन देखील मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांसमोर या मतदार आजोबांनी आदर्श वस्तुपाठ मांडला आहे. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासुन त्यांनी आजपर्यंत एकही मतदान चुकविले नाही. १९५० पासुन ते नियमितपणे मतदान करीत आहेत.
वालचंद नानचंद संघवी असे या ९६ वर्षीय मतदाराचे नाव आहे. संघवी हे त्यांच्या ज्येष्ठ वहिनी आसावरी संघवी(वय ७५) यांच्यासमवेत मतदानासाठी आले होते. मतदान करण्यासाठी ते स्वता कार चालवत येथील मतदान केंद्रावर पोहचले. यावेळी संघवी यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. मतदानानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी संघवी यांनी सांगितले की, १९५० पासुन मी मतदान करीत आहे. दैनंदिन जीवनात आपला आहार अत्यंत महत्वपुर्ण आहे.तीन दिवसांपेक्षा तळलेले पदार्थ आहारात घेत नाही . जैन धमार्तील तत्वानुसार ते एकच वेळ जेवण करतात.त्यानंतर पाणी सुध्दा घेत नाहित. आपले आयुष्य आपल्या वागण्यावर अवलंबुन असते, अशा शब्दात संघवी यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी जपलेल्या ' फिटनेस' चे रहस्य सांगितले.नवमतदारांनी सक्षम उमेदवार पाहुन मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.संघवी बारामती जैन धर्मीय देवस्थानचे अध्यक्ष होते.तसेच त्यांनी कुंथलगिरी देवस्थान ट्रस्टचे २५ वर्ष व्यवस्थापनाचे काम पाहिले असल्याची माहिती त्यांचे पुत्र नगरसेवक संजय संघवी यांनी दिली.