Maharashtra Election 2019 : आम आदमी पार्टीचा उमेदवार आला पीएमपीतून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:44 PM2019-10-03T13:44:26+5:302019-10-03T14:05:39+5:30
आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पीएमपी बसने प्रवास करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे : विधानसभा निवडणूकीचे अर्ज भरण्यासाठीचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने आज राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड येथून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज भरला. यंदा आम आदमी पक्ष सुद्धा विधानसभेच्या निवडणूकीत उतरले असून आपचे पर्वतीचे उमेदवार संदीप साेनवणे यांनी थेट पीएमपीमधून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आम आदमी पक्ष यंदा विधानसभेच्या निवडणूकीत उतरला आहे. आपकडून शहरातील विविध मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. आप नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध असते. त्यामुळे आम आदमी पक्षाचे पर्वतीचे उमेदवार संंदीप साेनावणे यांनी कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीयांसमवेत पीएमपीने येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएमपी हे सर्वसामान्यांचे वाहन असल्याने बसने प्रवास करत त्यांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाेलताना साेनावणे म्हणाले, ' सामान्यांबरोबर राहणारा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावे, मी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करेन".
दरम्यान विधानसभेच्या निवडणूक येत्या 21 ऑक्टाेबरला पार पडत आहे. पुण्यातील आठही मतदारसंघामध्ये भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभेला आठही जागांवर भाजपाने वर्चस्व मिळवले हाेते. यंदा काय निकाल लागताे याकडेच सर्वांचे लक्ष आहे.