Maharashtra Election 2019: 'सत्तेचा गैरवापर अन् राज्य 50 वर्षे मागे जात आहे; नेतृत्व बदलण्याची भूमिका घ्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 07:47 PM2019-10-03T19:47:53+5:302019-10-03T19:48:44+5:30
जुन्नर विधानसभा मतदारसंघ 2019 - शेतीच्या भागात आपण अनेक कष्ट घेतो परंतु त्याला योग्य भाव देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची दिसत नाही. देशात महागाई ही शेतकऱ्यांमुळे झाल्याचे राज्यकर्ते सांगतात
जुन्नर - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचाराला वेग आलेला आहे. आज देशाची आणि राज्याची सूत्र आपण ज्यांच्या हाती दिली त्यांच्याकडून आपले राज्य अनेक क्षेत्रात मागे पडत आहेत त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची भूमिका आपण घ्यायला हवी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर येथील जाहीर सभेत केले.
आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्याचा मला योग आलाय. मला आनंद होतोय की प्रचाराची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्याशी होतोय. सामान्यांसाठी ज्याने राज्य स्थापन केले त्यांच्या जन्मभूमीत पहिली सभा होतेय असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, या भागातील अनेक माणसांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम अतुल बेनके करतील असा विश्वास आहेच शिवाय मला खात्री आहे की, सुविद्य इंजिनिअरकडून या विभागाचा चेहरा बदलण्याचे काम नक्कीच होईल असा विश्वासही पवार यांनी अतुल बेनके यांचे कौतुक करताना व्यक्त केला.
शेतीप्रमाणे राज्यातील उद्योगधंदेही महत्त्वाचे आहेत. राज्यकर्ते कारखानदारी कमी करण्याचे काम करत आहेत. फक्त नाशिक जिल्ह्यात जवळपास हजारो तरुण बेरोजगार झाले. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय. pic.twitter.com/PqoWqlocD3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2019
तसेच शेतीच्या भागात आपण अनेक कष्ट घेतो परंतु त्याला योग्य भाव देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची दिसत नाही. देशात महागाई ही शेतकऱ्यांमुळे झाल्याचे राज्यकर्ते सांगतात. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. आजवर १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही पवारांनी केला. शेतीप्रमाणे उद्योगधंदा ही महत्त्वाचा आहे. आजचे राज्यकर्ते हे कारखानदारी कमी करायच्या मागे लागल्याचे दिसतंय. केवळ नाशिक जिल्ह्यात जवळपास १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राज्याची दुय्यम राजधानी आणि मुख्यमंत्री साहेबांचे नागपूर शहर गुन्हेगारीचे केंद्र झाले आहे. मात्र याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाही. सत्तेचा गैरवापर आजचे सरकार करत आहे. यातून राज्याला पाच- पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचे काम होत आहे असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.