Maharashtra election 2019 : सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 08:39 PM2019-10-11T20:39:41+5:302019-10-11T20:55:37+5:30
सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं.
पुणे (शेलपिंपळगाव) : सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं. एवढेच नव्हे तर माझ्यावरही गुन्हा दाखल करून ईडीची चौकशी लावली. मात्र विधानसभा निवडणुकीत ही मायबाप जनता महाआघाडीला न्याय देणार आहे. त्यानंतर सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आपण सरळ करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
चाकण (ता.खेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, आरपीआय (गवई गट) व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते - पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार तथा आघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील, प्रदीप गारटकर,राम कांडगे, जयदेव गायकवाड, रामदास ठाकूर, अनिल राक्षे, ऋषिकेश पवार, राजाराम लोखंडे, एस.पी. देशमुख, डी. डी. भोसले, बाळशेठ ठाकूर, सुगंधा शिंदे, निर्मला पानसरे, दीपाली काळे, चंद्रकांत इंगवले आदी उपस्थित होते़.
मोहिते पाटील म्हणाले, मागील पाच वर्षे विरोधी उमेदवार दादागिरी करून तालुक्याला एकत्र लुटत होते. सत्तेच्या माध्यमातून कारखानदारीतील अनेक ठेके मिळवले. ज्यांना स्वत:च्या घराकडं जाणारा रस्ता करता आला नाही, त्यांनी तालुक्याचा विकास सांगु नये. दरम्यान बाबा राक्षे, रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार आदींनी मोहिते पाटलांना विजयी करण्याची ठाम ग्वाही शरद पवारांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे तर आभार कैलास सांडभोर यांनी मानले.