Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 04:06 PM2019-10-20T16:06:24+5:302019-10-20T16:07:24+5:30
विधानसभेच्या निवडणुकीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने देखील खबरदारी घेतली असून पुण्यातील सर्व मतदानकेंद्र वाॅटरप्रुफ असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुणे: लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी कमी झाली होती.परंतु,आता पाऊस, वादळ आले तरीही पुण्यातील मतदार विधानसभा निवडणुकीसाठी नक्की मतदान करतील आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवतील,असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.तसेच सर्व मतदान केंद्र वॉटर प्रुफ असून मतदारांना मतदान करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवल किशोर राम म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 आॅक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे. देशातील सर्वाधिक सुशिक्षित,प्रबुध्द नागरिक अशी पुण्यातील नागरिकांची ओळख आहे. त्यामुळे ‘आंधी हो या तुफान हम करेंग जरूर ईस विधानसभा के लिए मतदान’हा विचार घेवून जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा.
पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांना भेट देवून मतदान केंद्रांची तपासणी केली असून सर्व ठिकाणी योग्य व्यवस्था असल्याची खात्री केली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर पाण्याची गळती होत नाही. मदारांना किंवा मतदान कक्षातील कर्मचा-यांना, ईव्हीएमला पावसामुळे कोणताही त्रास होणार नाही; याची दक्षता घेतली आहे. पावसावर मात करण्यासाठी मतदान केंद्रावर पूर्णपणे वॉटर प्रुफ व्यवस्था केली आहे,असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.