Maharashtra Election 2019 : भाजपा-शिवसेनेची थाळी खाऊन आमची थाळी ठरवू - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:20 AM2019-10-16T11:20:45+5:302019-10-16T13:08:29+5:30
'माझ्या कॅबिनेटमंत्री पदासाठी मोदींशी बोलण्याची विनंती केली आहे'
पुणे : भाजपाने 5 रुपयांना थाळी जाहीर केली आहे, तर शिवसेनेने 10 रुपयांना थाळी देणार असल्याचे म्हटले आहे. या दोघांच्या थाळ्या खाल्ल्यानंतर आमची थाळी ठरवू, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात आरपीआयचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, "आम्ही 8 रुपयांना थाळी जाहीर करणार होतो, परंतु भाजपाने 5 रुपयांना आणि शिवसेनेने 10 रुपयांना थाळी जाहीर केली. त्यामुळे या दोघांची थाळी खाऊन आम्ही आमची थाळी जाहीर करू. विधानसभेला आम्हाला आठ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. त्या मिळाल्या नाहीत. आम्ही त्या बदल्यात माझ्या कॅबिनेटमंत्री पदासाठी मोदींशी बोलण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर राज्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची देखील मागणी केली आहे. तसेच, 4 महामंडळाची मागणी देखील केली आहे".
याशिवाय, वंचितबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, 'वंचितचा किंचित परिणाम होणार नाही. वंचित आघाडी काढून वंचितांना वंचित ठेवण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. त्यांना सत्ता हवी असेल तर त्यांनी भाजपासोबत आमच्या सोबत यावे."