Maharashtra Election 2019 : कोथरुडमध्ये प्रचारात भाजपची वरिष्ठ, तर मनसेची कार्यकर्त्यांवर भिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:56 PM2019-10-16T13:56:19+5:302019-10-16T13:56:52+5:30
कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला.. परंतु, या निवडणुकीत तो अधिक चर्चिला गेला़...
पुणे : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधूननिवडणूक लढवित असल्याने भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे़. पुण्यात आलेल्या भाजपच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्यांनी कोथरूडमध्ये हजेरी लावून पाटील यांच्या प्रचारात भाग घेतला, तर दुसरीकडे आघाडीने पाठिंबा देऊ केलेल्या मनसेकडून निवडणूक लढविणारे अॅड. किशोर शिंदे यांची भिस्त सद्य:स्थितीला कार्यकर्त्यांवरच आहे़. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एखादी, तरी सभा कोथरूडमध्ये होईल व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवेल, अशी आशा त्यांना आहे़.
कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला; परंतु या निवडणुकीत तो अधिक चर्चिला गेला़. त्याला कारण चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी ठरली असली, तरी सर्वच स्तरावर पाटील यांनी आघाडी घेऊन प्रचारात जोर धरला आहे़. त्यातच चंद्रकांत पाटील मतदार संघात असो वा नसो; पण कोथरूडमधील भाजपचे सर्वच पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कामास लागल्याचे दिसून येत आहे़. नगरसेवकांनी तर आप-आपल्या कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा चंग बांधला आहे़. नुकतीच झालेली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा असो वा चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी असो, या प्रत्येक ठिकाणी दुसºया पक्षातील कार्यकर्ते़ पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश हा पूर्वनियोजितच असतो़. सध्या कोथरूडमधील ‘इनकमिंग’ ही जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे़. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन, रवी शंकर, प्रकाश जावडेकर, खासदार नामग्याल आदींच्या सभा म्हणजे पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीची प्रचितीच देत आहेत़. पाटील यांच्यासमोर मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांचे आव्हान आहे़. गेल्या निवडणुकांमधील त्यांची लढत लक्षात घेता व या वेळी त्यांना मिळालेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा ते नक्कीच गत मताधिक्यापेक्षा अधिकची मते मिळविणार, हे निश्चित आहे़. परंतु सद्य:स्थितीला मनसेचा कुठलाही नेता किंबहुना मनसेप्रमुख राज ठाकरे तथा आघाडीचे नेते त्यांच्या प्रचारासाठी सरसावले नाहीत़. तरीही अॅड़ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या दमावर आपल्या प्रचाराला वेग दिला आहे़. जागोजागी निवडणूक कचेºया खोलून मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचविण्यात मनसेने आघाडी घेतली आहे़.
कोथरूडमध्ये बसपाचे प्रवीण थोरात आम आदमी पक्षाचे डॉ़. अभिजित मोरे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ दीपक शामदिरे, तर प्रजासत्ताक भारत पक्षाचे लक्ष्मण चव्हाण हेही रिंगणात असून, त्यांचाही आपापल्या परीने प्रचार सुरू असून, गाठीभेटी, कोपरासभेवर भर आहे़.