Maharashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:19 PM2019-10-15T12:19:54+5:302019-10-15T12:20:54+5:30
गाडी मागे ठेवून छोट्या वस्त्यांमधून रिक्षातून प्रवास
पुणे : प्रचारफेरी दरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळ यांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १० मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. प्रभागातील नवग्रह मंदिर, भालकेनगर, अत्रे सोसायटी, गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर मार्गे ही पदयात्रा आशिष गार्डन येथे समाप्त होणार होती.
या पदयात्रेनंतर बालेवाडी येथील नियोजित रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभेला जाणे गरजेचे होते. गल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने चंद्रकांतदादांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्त्रीनगर येथून रिक्षाने जात प्रचार केला. तसेच रिक्षाने मुख्य महामार्गापर्यंत प्रवास केला. यानंतर मुख्य मार्गावर आपली नेहमीची गाडी आल्यानंतर बालेवाडीकडे प्रस्थान केले. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीतही दादांनी आपल्यातील साधेपणा जपत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास केला आणि वाहतूककोंडी टाळली, याचे कोथरूडकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.
......