मुख्यमंत्रीपदासाठी वेळ यायला हवी ; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 02:36 PM2019-10-07T14:36:50+5:302019-10-07T14:43:12+5:30
भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षावर कोणताही अन्याय केला नसून आमच्यासाठी जागा नाही तर राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुणे :भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षावर कोणताही अन्याय केला नसून आमच्यासाठी जागा नाही तर राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले. इच्छा वेगळी असते आणि व्यवहारमध्ये वेळ यायला हवी असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले.
पुण्यात त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कोथरूडमध्ये अडकल्याने मला याविषयी कमी माहिती आहे. मी ती मुलाखत बघितली नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. इच्छा वेगळी असते आणि व्यवहारमध्ये वेळ यायला हवी. निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.