Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांना घरची गुन्हेगारी घालविता आली नाही : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:39 PM2019-10-12T12:39:50+5:302019-10-12T12:44:27+5:30
मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालता आला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’
दौैंड : ‘‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरची गुन्हेगारी घालवता आलेली नाही, त्यामुळे राज्यातील काय परिस्थिती असेल,’’ असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभेत लगावला.
वरवंड (ता. दौंड) येथे राष्ट्रवादीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे आणि ते मूळचे नागपूरचे. मी दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये होतो. तेथील काही लोक मला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक झाला आहे, अशा तक्रारी केल्या. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालता आला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’
राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. शेती व्यवसायाला हमीभाव नाही. अशा संकटकालीन परिस्थितीत फडणवीस यांचे शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले नाही. याउलट केंद्रात मी कृषिमंत्री असताना ७१ हजार कोटींची सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. शेतकºयांनी केवळ शेतीव्यवसायावर अवलंबून राहता कामा नये.
घरातील एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी कामधंदा किंवा नोकरी बघावी; तरच आर्थिक घडी बसेल आणि शेतकरी आत्महत्येपासून दूर राहतील.
केरळमध्ये ६ लाख मराठी बांधव नोकरी करीत आहेत. तेव्हा नोकरीसाठी कुठेही जायची तयारी असेल तर त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असेही पवार म्हणाले.
..........
भविष्यात लष्कराचे नेतृत्व महिला करतील
भविष्यात लष्कराचे नेतृत्व महिला करतील, असे शरद पवार यांनी जाहीर भाषणात सूतोवाच केले. महिलांना राजकारणात आणि समाजकारणात समतेच्या तत्त्वावर संधी दिली. भविष्यात महिलांना विविध क्षेत्रांत संधी चालून येणार आहे. या संधीचे सोने महिलांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.