Maharashtra Election 2019 : आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाची राहणार काटेकोर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 02:39 PM2019-10-07T14:39:18+5:302019-10-07T14:45:24+5:30
भरारीपथके तैनात : गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी लागणार;
प्रकाश गायकर-
पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाच्या वतीने काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. २८ लाखांपेक्षा जास्त खर्च उमेदवारांना करता येणार नाही. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीही उमेदवारांना जाहीर करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये उमेदवाराने व राजकीय पक्षातील व्यक्तीने काय करावे व काय करू नये याची यादी देण्यात आली आहे. त्यानुसारच उमेदवार व कार्यकर्त्यांना वागावे लागणार आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रचारासाठी राजकीय पक्षाकडून किती वाहने वापरण्यात येणार, किती लोक असणार. त्यासोबतच प्रचारामध्ये कार्यकर्त्यांचा नाष्टा व जेवणावर किती खर्च करण्यात आला याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. वाहने, स्टेज, जेवण आदी खर्चासाठी उमेदवाराला २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या रकमेच्या आतच उमेदवाराला खर्च करता येणार आहे. आचारसंहितेच्या काळात टीका करताना नेत्यांना व उमेदवारांना बोलताना स्वत:वर ताबा ठेवावा लागणार आहे. राजकीय धोरणाव्यतिरिक्त एखाद्याची जात अथवा धर्म यावर टीका करता येणार नाही. प्रचार करत असताना मतदारांना आमिष दाखवणे, धमकावणे हा गुन्हा ठरणार आहे. या काळामध्ये सरकार, स्थानिक महापालिका, नगर परिषदा यांना सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही. तसेच या काळामध्ये नव्या घोषणा, कामासाठी निधी जाहीर करणे व कामांचे उद्घाटने करता येणार नाही. मतदारांना प्रलोभन दाखवणे आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. त्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
पथकांच्या माध्यमातून वॉच
कोणत्याही वस्तू, मद्य याचे वाटप होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच सभा, प्रचारफेºया, मिरवणूक यावर लक्ष ठेवण्यासाठीही पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये बँकांमधून होणाºया व्यवहारांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आयकर विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत.
.........
रॅलीचे चित्रीकरण करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. चित्रीकरण तपासून निवडणूक आयोगाला किती खर्च झाला असेल हे कळवले जाणार आहे. फ्लाईंग स्कॉड, स्थिर पथके, फिरती पथके यांची निर्मिती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. - औदुंबर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघ
.........
* आचारसंहितेतील ठळक मुद्दे -
कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण यावर बंदी
सरकारी वाहनांचा वापर करण्यास बंदी
मतदारांना प्रलोभन दिल्यास निवडणूक रद्द
शांतता भंग पावणार नाही याची काळजी
स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला द्यावी लागणार
सोशल मीडियावरील खर्चही सादर करावा लागणार
हॉटेल्स व धाबे रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहणार