Maharashtra Election 2019 : ‘पर्वती’ सर करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 02:00 PM2019-10-16T14:00:57+5:302019-10-16T14:23:12+5:30
भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, पर्वती मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून असंघटित कामगार, अल्पसंख्याक आणि व्यापारी वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पर्वती मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे. बिबवेवाडीपासून स्वारगेटपर्यंत आणि स्वारगेटपासून थेट हिंगणे-सिंहगड रस्त्यापर्यंत पसरलेल्या मतदार संघात मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमधून आणि परराज्यातून स्थलांतरित झालेले नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात.
दोन्ही पक्षांकडून आपापल्यापरीने या समाज समूहांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या उमेदवार मिसाळ यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर, मतदारसंघात पंकजा मुंडे यांची सभा घेण्यात आली. यासोबतच शहर पातळीवरील नेते-पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत. तर, राष्ट्रवादीकडून कदम यांच्या प्रचारासाठी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी असंघटित कामगारांचा मेळावा घेतला.
डॉ. वंदना चव्हाण, मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड आदी नेते प्रचारात उतरले आहेत. तर, काही प्रमुख पक्षनेते प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकाºयांना सक्रिय करण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.
.....................
पर्वती मतदारसंघात एकूण २५ नगरसेवक आहेत. यातील तब्बल २४ नगरसेवक भाजपचे असून, त्यामध्ये दोन स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे. त्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद कमी आहे. राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा अवघा एक नगरसेवक या मतदारसंघात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचार करताना आणि निवडणूक यंत्रणा राबवित असताना नगरसेवकांच्या संख्येचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.
व्यापारी वर्गाला गळ
पर्वतीमध्ये सर्वाधिक व्यापारी राहतात, तसेच व्यवसाय करतात. या व्यापारी व उद्योजकांना चुचकारण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुकुंद नगर येथील सभागृहात व्यापारी वर्गाची बैठक घेतली. जीएसटी, नोटाबंदी आदी मुद्द्यांवरुन व्यापारी वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, तर भाजपनेही या व्यापारी वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील नेत्यांची मदत घेतली आहे. या राज्यांमधील नेते मतदारसंघात येऊन आपापल्या भागातील लोकांशी संवाद साधत आहेत.