Maharashtra election 2019 : पुण्यातील अरण्येश्वर येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली 11 लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:50 PM2019-10-04T12:50:15+5:302019-10-04T12:51:27+5:30
दोन दिवसांत दुसरी कारवाई..
पुणे : पर्वती मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकार नगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान 11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका काळ्या रंगाचा मोटारीत मिळून आली असून मेडिकल वेस्ट चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ही रोकड आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थिर पथकाने महर्षी नगर येथे पावणे तीन लाखांची रोकड मध्यरात्री पकडली होती.
पथक प्रमुख संतोष भाईक, योगेश खरात, सागर सांगरे, सागर गवांदे, किरण साबळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सुप्रिया शेवाळे, अतुल सुंभकर असे सर्वजण संतनगर येथे वाहन तपासणी करीत होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काळ्या रंगाची मोटार पथकाने अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये एका रेक्झिन बॅगेत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. कर्मचाऱ्यांनी ही रोकड मोजली असता एकूण 11 लाख 1 हजार 260 रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधीत व्यापारी घरून त्याच्या ऑफिसला जात असताना ही रोकड सोबत बाळगून होता. पथकाने पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.