Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - हडपसर मतदारसंघातील मतविभाजनाचा लाभ कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 01:34 PM2019-10-18T13:34:20+5:302019-10-18T13:36:00+5:30
हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत.
- सुषमा नेहरकर-शिंदे
हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत असून, या तिरंगी लढतीचा लाभ कुणाला होणार यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदार संघात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे व मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार हाच टिळेकरांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. तर मतदारसंघातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, पाणीप्रश्न आणि कचरा डेपोचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे चेतन तुपे रिंगणात उतरले आहेत. मनसेचे वसंत मोरे यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी केली आहे. आमदार योगेश टिळेकर यांचा येवलेवाडी डी.पी. कचरा प्रकल्प, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांशी संगनमताने केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहेत. टिळेकर, तुपे आणि मोरे यांच्यामध्येच हडपसरची तिरंगी लढत होत आहे. सनेचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. सेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली जात असल्याचीदेखील चर्चा आहे. यामुळे याचा टिळेकरांना फटका बसणार किंवा कसे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना मतदारसंघात असलेले सर्व नगरसेवक मदत करणार का, वसंत मोरे कात्रजसह अन्य भागातील किती मते खाणार यावर हा निकाल अवलंबून राहणार आहे.
......
मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का ?
लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. तसेच राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांची संख्यादेखील भाजपच्या तुलनेत अधिक आहे. विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का? हे महत्त्वाचे ठरणार आहे.