Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:55 PM2019-10-14T20:55:51+5:302019-10-14T20:56:17+5:30
पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही.
पुणेः पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यात शिवसेना दिसत नाही, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरात जागा देत नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार म्हणून भाजपाबरोबर युती केली, भाजपा शिवसेनेला मान देत नाही, तरी युती का?, माननीय बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती. आज असं करायची कोणाची हिंमत झाली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला आहे. ते कसब्यातील सभेत बोलत होते.
ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?, असं म्हणत राज ठाकरेंनी राधाकृष्ण विखे-पाटलांनाही खडे बोल सुनावले आहेत. मला विरोधासाठी विरोध करण्याचं काम करायचं नाही. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो. ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे की, 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते'. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
इतिहास शालेय पुस्तकांमध्ये सांगितला जात नाही. स्मारक तयार करण्याच्या घोषणा केल्या जातात. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला, पण अद्याप शिवस्मारक उभारता आले नाही. स्मारकाचे केवळ राजकारण केले जाते. स्मारक तयार करण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खर्च करण्याची आवश्यकता आहे. सिंचन झालेले नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देश मागे आला. सोशल मीडियामुळे देशात काय वातावरण आहे हे कळतं. देशात सध्या भीषण परिस्थिती आहे. नोटाबंदी फसली तर देश खचेल असं मी म्हणालो होतो, याची आठवणही राज ठाकरेंनी करून दिली.